You are currently viewing कुडाळमध्ये लवकरच भंडारी समाज भवनाचे स्वप्न साकार होणार!

कुडाळमध्ये लवकरच भंडारी समाज भवनाचे स्वप्न साकार होणार!

कुडाळमध्ये लवकरच भंडारी समाज भवनाचे स्वप्न साकार होणार!

शासन आणि प्रशासकीय स्तरावरील सर्व प्रक्रिया पूर्ण; आठ ते पंधरा दिवसांत सातबारा मिळविण्यासाठी प्रयत्न – पालकमंत्री नितेश राणे

ओरोस : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाजाच्या अनेक वर्षांच्या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप मिळणार आहे. कुडाळ येथे जिल्हा भंडारी समाज भवनासाठी आवश्यक असलेल्या शासन व प्रशासकीय स्तरावरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, येत्या आठ ते पंधरा दिवसांत या जागेचा सातबारा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच कुडाळ येथे भंडारी समाज भवनाचे स्वप्न पूर्ण होईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन समाज भवनाच्या कामाबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत करगुटकर, देवगडचे बाबुशेट सावंत, भंडारी समाजाचे नेते बाळ खडपे, वैभव करंगुटकर, सचिव हेमंत सावंत, गोपाळ रुमडे, विलास गोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की, पालकमंत्री झाल्यानंतर भंडारी समाजाचे नेते अतुल बंगे आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हा भंडारी समाज भवनाची मागणी केली होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त आणि महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. समाज भवनासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
या कामासाठी जिल्हा प्रशासन, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे तसेच कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भंडारी समाज भवन व्हावे यासाठी कोणतेही राजकारण न करता प्रामाणिकपणे प्रयत्न केले. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनीही सातत्याने पाठपुरावा केला. येत्या आठ ते पंधरा दिवसांत भंडारी समाज भवनाच्या जागेचा सातबारा मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे प्रयत्नशील असून, यासाठी पालकमंत्री म्हणून आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कुडाळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा भंडारी भवन उभारण्यात यावे, अशी एकमुखी मागणी भंडारी समाजाच्या विविध तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी केली होती. यासाठी कुडाळ येथील शासकीय भूखंड मिळावा म्हणून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला. अखेर हा भूखंड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
यावेळी कुडाळ तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष अतुल बंगे, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे कार्याध्यक्ष राजू गवंडे, ज्येष्ठ नेते मामा माडये, रमण वायंगणकर, सावंतवाडी भंडारी समाजाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, बाळासाहेब खडपे, मालवण तालुकाध्यक्ष रवी तळाशीलकर, कणकवलीचे निलेश गोवेकर, महासंघाचे अध्यक्ष हेमंत करगुटकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मोहन गवंडे, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विलास गडेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा