ओसरगाव तलावाच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर; लवकरच होणार लोकार्पण
राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ दशावतारी कलावंत कै. बाबी नालंग यांच्या नावाने उद्यान उभारण्याची ग्रामस्थांची मागणी
ओसरगाव :
ओसरगाव तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच ग्रामस्थांच्या उपस्थितीत या सुशोभीकरण केलेल्या तलावाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तलावाच्या विकासकामामुळे ओसरगावच्या सौंदर्यात भर पडणार असून, गावाच्या पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे.
दरम्यान, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, ओसरगावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ दशावतारी कलावंत कै. बाबी नालंग यांच्या स्मृती जतन करण्यासाठी या उद्यानाला त्यांचे नाव देण्यात यावे, तसेच उद्यान परिसरात त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
तलावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणानंतर भरघोस निधी उपलब्ध झाला. याबद्दल महाराष्ट्र शासनाचे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जनसुविधा केंद्रासाठी अंदाजे ४ कोटी रुपये, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NH-66) कडून अंदाजे ३ कोटी रुपयांचा निधी नव्याने मंजूर करण्यात आला आहे. ही कामेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
ओसरगावच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणाऱ्या शासन, प्रशासन आणि संबंधित सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत असून, ‘आमचा गाव, सुंदर गाव – ओसरगाव’ या संकल्पनेतून गावाचा विकास साधण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.
