वेंगुर्ल्यात सोमवारी महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन!
लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला नगरपरिषद आणि अनुलोमचा संयुक्त उपक्रम; सकाळी १० वाजता शिबिराला सुरुवात
वेंगुर्ला : प्रतिनिधी
महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन व प्रमाणपत्र मिळविण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला, वेंगुर्ला नगरपरिषद आणि अनुलोम यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात हे शिबिर होणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रासंदर्भात आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे.
वेंगुर्ला परिसरातील महिला शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
