सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एमआयडीसी विश्राम गृह येथे, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्हा सर्वंकष जिल्हाध्यक्ष तथा सुप्रिमो शैलेश मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ह्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्यांच्या स्वागत करण्यात आले. या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन करून उपस्थितांच्या मान्यतेने त्याला मंजुरी देण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व तालुका स्तरावर संघटन अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच पत्रकारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध सदस्यांचे दृष्टीकोन समजून घेत संवाद साधण्यात आला.
ह्या बैठकीत धोरणात्मक रणनिती विषयी चर्चा व निर्णय घेण्यात आले. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी खोपोली येथे आयोजित कोकण विभागाच्या कॅडर कॅम्पमधील सर्व सदस्यांच्या सहभागाबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला व्हाॅईस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग सर्वंकष जिल्हाध्यक्ष तथा सुप्रीमो शैलेश मयेकर यांच्या सह राज्य सह संघटक समीर म्हाडेश्वर, कोअर कमिटी सदस्य व जिल्हा उपाध्यक्ष जय भोसले, उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष विष्णू धावडे, दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष भूषण सावंत, सचिव अमित पालव, कोषाध्यक्ष आनंद कांडरकर, जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद धुरी, जिल्हा उपाध्यक्ष सुयोग पंडित, जिल्हा उपाध्यक्ष राजा दळवी, जिल्हा संघटक नयनेश गावडे, कुडाळ तालुकाध्यक्ष देवेंद्र गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष यश माधव, दोडामार्ग तालुकाध्यक्ष आप्पा राणे, कुडाळ तालुका सचिव योगेश खाडे, कोकण विभाग महिला विंग अध्यक्ष समिधा खपाले, सिंधुदुर्ग महिला विंग जिल्हाध्यक्ष प्रिया मेस्त्री उपस्थित होते.
यावेळी सुप्रिमो शैलेश मयेकर यांनी, व्हाॅईस ऑफ मिडिया संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकारिता यांच्या शाश्वत विकास आणि सन्मानासाठी संस्थापक संदीप काळे आणि प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, कोकण विभाग अध्यक्ष कुमार कडलग व सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक व समाधानकारक कार्यपद्धतीच्या प्रवाहात कर्तव्यनिष्ठ सजगतेने कार्यरत रहायचे आवाहन केले.
या बैठकीला राज्य कोअर कमिटी सदस्य जय भोसले व राज्य संघटक समीर म्हाडेश्वर यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले.
