You are currently viewing होडावडे ग्रामस्थांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार

होडावडे ग्रामस्थांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार

होडावडे ग्रामस्थांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार

दुष्काळसदृश परिस्थितीत श्रमदानातून ओढ्यावर वनराई बंधारा

सावंतवाडी

एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होडावडे येथील ग्रामस्थांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि श्रमदानातून होडावडे बाजारपेठेनजीकच्या ओढ्यावर वनराई बंधारा उभारण्यात आला.
होडावडे गावातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असून, आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामस्थांनी सिमेंटच्या पिशव्यांच्या साहाय्याने ओढ्यावर बंधारा बांधला.
या कामासाठी ग्रामस्थांनी श्रमदान तसेच आवश्यक सहकार्य केले. वनराई बंधाऱ्यामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह काही काळ अडवून पाणीसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच या पाण्याचा जमिनीत निचरा झाल्याने परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यासही हातभार लागणार आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत शासनाच्या मदतीची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंवर्धनासाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. गावातील इतर भागांतही अशा प्रकारचे छोटे बंधारे उभारण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.