तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे निर्विवाद वर्चस्व
१४, १७ व १९ वर्षे वयोगटात तिन्ही संघ विजयी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र
आंबोली
क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आंबोली येथे तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध शाळांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत १४ वर्षे शालेय मुले वयोगटात ५ संघ, १७ वर्षे शालेय मुले वयोगटात ५ संघ, तर १९ वर्षे शालेय मुले वयोगटात ३ संघांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त, जिद्द आणि क्रीडाकौशल्याचे दर्शन घडवत तिन्ही वयोगटांत विजेतेपद मिळविले.
१४ वर्षे शालेय मुले वयोगटात सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. खेमराज स्कूल, बांदा संघाने उपविजेतेपद मिळविले. आंबोलीच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण आणि शिस्तबद्ध खेळ करत आपल्या संघाचे वर्चस्व कायम ठेवले.
१७ वर्षे शालेय मुले वयोगटातही सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सेंट फ्रान्सिस झेवियर, आजगाव संघाने उपविजेतेपद पटकावले. आंबोलीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक समन्वय आणि आक्रमक खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
१९ वर्षे शालेय मुले वयोगटात सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले, तर मिलग्रीस स्कूल, सावंतवाडी संघाने उपविजेतेपद पटकावले. अनुभवी खेळाडूंच्या प्रभावी खेळामुळे आंबोलीच्या संघाने स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.
अशाप्रकारे सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीने १४, १७ आणि १९ वर्षे या तिन्ही वयोगटांत विजेतेपद मिळवून तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी केली. विशेष म्हणजे तिन्ही विजेते संघांनी जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळविली असून, पुढील स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे.
या उल्लेखनीय यशामुळे सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, शिस्त, संघभावना आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे हे यश शक्य झाले. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री सतीश आईर, मनोज देसाई, शिवराज पवार, जयराम कोळी याचे मार्गदर्शन लाभले.
या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सचिव श्री. जॉय डांटस, प्राचार्य श्री. नितीन गावडे, कार्यालयीन सचिव श्री. दीपक राऊळ,पालक यांनी तिन्ही विजयी संघांचे खेळाडू, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या तिन्ही संघांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
