रक्ताचा माणूस जनसेवक दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी वाढदिवस अभिष्टचिंतन
जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारून सामाजिक क्षेत्रात रक्तदान चळवळीतून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेलं युवा नेतृत्व म्हणजे नगरसेवक दुर्गेश उर्फ देव्या रमेश सूर्याजी..!
जवळपास गेली १०/११ वर्षे समाजसेवकांच्या आदर्शावर आणि आपले आजोबा राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते स्वातंत्र्यसैनिक कै.रामचंद्र मोरजकर यांचा आदर्श आणि आई सौ.समता सूर्याची यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन शालेय जीवनापासून समाजसेवेत झोकून देऊन काम केले. अपघात, प्रसूती, शस्त्रक्रिया आदींच्या वेळी रुग्णांची रक्तवाचून होणारी गैरसोय लक्षात घेऊन देव्या सूर्याजी यांनी व्यापक रक्तदान चळवळ उभी केली. रक्तदान चळवळीला पुढे नेताना त्यांनी युवा सहकाऱ्यांना हाताशी घेऊन चळवळीला मूर्त स्वरूप आणत “युवा रक्तदाता संघटना” स्थापन केली.
युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काम करताना केवळ सावंतवाडीतील रुग्णांनाच नव्हे तर जिल्हाभरातील रक्ताची कमतरता भासणाऱ्या रुग्णांसाठी ते आधारस्तंभ बनले. सिंधुदुर्गासह गोवा, कर्नाटक, कोल्हापूर आदी ठिकाणी दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी युवा रक्तदाता संघटनेच्या रक्तमित्रांसह रक्तदान करण्यासाठी ते धावून जाऊ लागले त्यामुळे रक्तमित्र म्हणून जिल्हाभरात त्यांची स्वतःची ओळख निर्माण झाली. कुणालाही रक्ताची गरज भासत असेल तर आजही नजरेसमोर पहिले नाव येते ते देव्या..! सावंतवाडीतील रक्तपेढी बंद पडू नये यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने करून रक्तपेढी कार्यरत राहण्यासाठी अमूल्य योगदान दिले. वातानुकूलित रक्तपेढी, सिटी स्कॅन मशीन आदी सुविधांसाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. सावंतवाडी रुग्णालयात असणाऱ्या असुविधा, डॉक्टरांची कमतरता आदी विषयांवर त्यांनी आवाज उठवून सरकारला धारेवर धरत सामाजिक कार्यकर्ता कसा असावा याचे एक उदाहरण दिले. आयुष मंत्रालय संचलित आयुष रुग्णालय धारगळ गोवा यांची ओपीडी सावंतवाडी येथे सुरू करण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. सावंतवाडी येथे आवश्यक असलेली कामे होत नव्हती म्हणून अलीकडेच १५ ऑगस्ट रोजी त्यांनी धरणे आंदोलन देखील केले होते. कोरोनाच्या काळात तर दिवसरात्र रस्त्यावर उतरून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात त्यांनी औषध फवारणी मोहीम राबविली, मुक्या भटक्या कुत्र्यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना अन्न दिले. त्यांच्या रुग्णसेवेची दखल घेऊन आमदार प्रतिनिधी म्हणून रुग्णसेवा नियामक समितीवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
सामाजिक क्षेत्रात काम करत असतानाच जनतेचे विविध प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होऊ लागले. शहरातील रस्ते, वीज, पाणी समस्यासह जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आम. दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली राजकीय प्रवासाला सुरुवात केली. राजकारणाची पहिली इनिंग खेळताना ते जनतेच्या दरबारात स्वतःला आजमावून पाहत नगरसेवक म्हणून शिवसेना पक्षाकडून पहिलीच निवडणूक लढविली आणि भरघोस मतांनी निवडून येत खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी म्हणून ते सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात गेले. निवडून आल्यानंतर देखील त्यांनी शहरातील नळपाणी योजना, गॅस पाइपलाइन आदी साठी खोदलेल्या रस्त्यांमुळे झालेली रस्त्यांची दुर्व्यवस्था, नळपाणी योजनेच्या कामातील त्रुटी, बोगस काम, नगरपालिकेसाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी अशा अनेक प्रश्नांवर आवाज उठवत त्यांनी आपल्या कामातून नगरसेवक ही व्याख्या काय असते याचा प्रत्यय सावंतवाडीकर जनतेला दिला. सावंतवाडी नगरपालिकेच्या कामांमध्ये सुव्यवस्था आणण्यासाठी ते सदैव रस्त्यावर उतरतात, कित्येकदा अधिकारी मुख्याधिकारी यांना देखील अंगावर घेत योग्य तऱ्हेने काम करण्यास भाग पाडतात.
जनतेचा सेवक म्हणून सावंतवाडी शहरात राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आपला माणूस, रक्ताचा माणूस म्हणून जनतेच्या मनावर राज्य करणारे कणखर युवा नेतृत्व दुर्गेश उर्फ देव्या रमेश सूर्याजी यांना संवाद मिडियाकडून वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…
