*अहिल्यादेवी म्हणजे अध्यात्म आणि भौतिकता यांचे संचित! – डाॅ. श्रीपाल सबनीस*
*कुलगुरू प्रा. डाॅ. कर्नल प्रकाश महानवर लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*
पिंपरी
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे अध्यात्म आणि भौतिकता यांचे संचित होय!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे बुधवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी व्यक्त केले. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी या संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. कर्नल प्रकाश महानवर यांना पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार, लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. पांडुरंग भोसले, मसाप भोसरी शाखेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, प्र – कुलगुरू प्रा. डाॅ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव प्रा. डाॅ. अतुल लकडे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या सोलापूर विद्यापीठाची महती देशात सर्वत्र पसरलेली आहे. त्या विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर यांनी पर्यावरणाची विश्वात्मक जाणीव जोपासली आहे. बाबा भारती यांचे जीवन करुणेचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करून महेंद्र भारती हे आपल्या बापाची पुण्याई पेरण्याचे काम करीत आहेत. वैविध्यपूर्ण असलेल्या भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेतूनच भारत महासत्ता अन् महागुरू होईल!’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. डाॅ. कर्नल प्रकाश महानवर यांनी, ‘पुरस्काराने जबाबदारी वाढली असून शिक्षकाच्या नावाने असलेला पुरस्कार एका शिक्षकाला मिळाल्याने मनापासून आनंद झाला. हा पुरस्कार मी माझ्या मात्यापित्याला समर्पित करतो. ‘सर्वांचे भले कर!’ अशी शिकवण गौतम बुद्धांची पाली भाषा देते. त्या भाषेतील शब्दकोशकार बाबा भारती यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिष्ठानने १०१ वृक्षांची देणगी विद्यापीठाला द्यावी; तसेच डिसेंबर महिन्यात प्रतिष्ठानच्या वतीने पाली – मराठी भाषा संमेलनाचे आयोजन करावे!’ अशी भावना व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्यगीत, विद्यापीठ गीत यांचे गायन; प्रतिमापूजन आणि वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकातून बाबा भारती यांनी पाली भाषेविषयी केलेल्या कार्याची आणि लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानने गेल्या वीस वर्षांत आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली; तसेच प्रतिष्ठानच्या वतीने विद्यापीठाला २५१ वृक्ष देण्यात येतील, अशी ग्वाही दिली. प्रा. डाॅ. लक्ष्मीकांत दामा यांनी प्रकाश महानवर यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली. डाॅ. पांडुरंग भोसले यांनी मानपत्राचे वाचन केले. निमिष भारती, रवींद्र भारती, प्रकाश कांबळे, रमेश ढाले, सुरेश देशमुख, दीक्षा भारती, बाबा कांबळे, कुमुदिनी गाडे, विजय कांबळे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. डाॅ. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डाॅ. अतुल लकडे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
