मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विविध विकासकामांना मंजुरी
नोव्हेंबरपासून कामांना सुरुवात; गाळाच्या समस्येमुळे त्रस्त मच्छीमारांना मिळणार दिलासा
३७० मीटर अतिरिक्त धक्काभिंत, गाळ काढणे व रुंदीकरणासह विविध कामांचा समावेश
उरण : करंजा बंदराच्या विकासासाठी शासनाने तब्बल १३६.७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून गाळाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या मच्छीमारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाने करंजा बंदरातील विविध विकासकामांसाठी हा निधी मंजूर केला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या कामांना सुरुवात होणार आहे.
करंजा बंदरातील बोटींच्या प्रवेश मार्गावरील गाळ काढणे, अतिरिक्त रुंदीकरण तसेच ३७० मीटर अतिरिक्त लांबीची धक्काभिंत उभारणे यासह विविध विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. बंदरातील गाळाची तसेच अतिरिक्त धक्काभिंतीची समस्या दूर होणार असल्याने रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांना याचा लाभ होणार आहे.
करंजा मच्छीमार बंदरातून मासेमारी हंगामात सुमारे ५५० कोटी रुपये किमतीच्या मासळीची निर्यात होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून बंदरात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने मच्छीमारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाळामुळे ओहोटीच्या वेळी मासळी उतरवून पुन्हा समुद्रात जाण्यासाठी मच्छीमारांना बंदरातच चार ते सहा तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे बंदरात तसेच बंदराबाहेर शेकडो बोटी गाळात अडकून पडतात.
या पार्श्वभूमीवर करंजा मच्छीमार संस्था व मच्छीमारांकडून बंदरातील गाळ काढण्याची सातत्याने मागणी केली जात होती. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे.
मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने करंजा मच्छीमार बंदरातील २१ विविध कामांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे यांनी दिली.
यामध्ये प्रामुख्याने ३७० मीटर लांबीची अतिरिक्त धक्काभिंत उभारण्यासाठी २६ कोटी ७७ लाख ८८ हजार ६३२ रुपये, तर प्रवेश मार्गावरील गाळ काढणे व रुंदीकरणाच्या कामासाठी २१ कोटी २५ लाख ४७ हजार ८३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
याशिवाय बंदरातील काँक्रीटीकरण, लिलाव केंद्र क्रमांक ४, प्रशासकीय भवन, संपर्कासाठी रेडिओ भवन, उपहारगृह, सुरक्षा कक्ष, कंपाऊंड वॉल, सेव्हरेज ट्रीटमेंट प्लाण्ट, बर्फ फॅक्टरी, १०० टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, पाणीपुरवठा, ड्रेनेज, सेव्हरेज सिस्टीम, डिझेल पंप आदी विविध कामांसाठी ८८ कोटी ७५ लाख ४७ हजार ७३६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
