You are currently viewing संवाद बाप्पाशी

संवाद बाप्पाशी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*~~ संवाद बाप्पाशी ~~*

 

तो कुठेही जात नाही,आई शप्पथ !

खरंच , तो कुठेही जात नाही.तो इथेच असतो.

आजकाल तर त्याला ढोल ताशांचा गजरही नको असतो आगमनाला नि निर्गमनाला.

 

तो येतोच मुळी अमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयच्या हस्ते.

आल्या आल्या भाकरतुकडा ओवाळणें राहू द्या ,अगोदर सॅनिटायझर शिंपडा म्हणतो.

माझ्यावरच नाही तर दिल्या घेतल्या पैशांवर पण शिंपडा म्हणाला तो.

 

दहाही दिवस आरती तीही

टाळ्यांचा कडकडाट आणि शंख नादांत करु या, नकोच नको कसं रे ? हवं हवं म्हणू या .

आजकाल तर उर भरुन येते ना रे !

आणि टाळ्या पिटतांना जॉईंट दुखतात ते वेगळेच की रे !

 

विसर्जनालाही मिरवणूक नको म्हणाला तो.

इन्व्हायरोनमेंटल आहे म्हणालो तरी नकोच नको म्हणाला तो.

 

घरच्या घरीच करु या विसर्जन म्हणाला तो.

बादलीत विसर्जन नंतर कुंड्यांमध्ये शेष मृत्तिकाजल.

फार सोपं आहे रे हे!

 

बाप्पा,

असा कसा रे तू ?

विसर्जन मिरवणुकीतल्या त्या नासिक ढोलच्या तालावर नाचायचं आहे रे मला !

आणि तुला नाही का तो यशवंत व्यायाम शाळेचा मलखांब बघायचा?

 

आणि

ती ,देशपांडेच्या शिट्टीच्या तालावर खनखणणारी गुलालवाडीची लेझीम,तो तालबद्ध नऊवारी आणि नथीच्या साजशृंगारा सहित केलेला ललनांचा ढोल आविष्कार पाहायचाय ?

रात्र रात्र जागून त्यांनी केलेला तो सराव तुला का पाहायचा नाही ?

 

जमिनीवर सररदिशी घासत ठिणग्या उडवणारा मोहन मास्तर आणि दंडे हनुमानच्या तालीम बहाद्दरांनी चालवलेला दांडपट्टा,नाही पहायचा तुला?

 

सरदार चौकातल्या उमद्या भरगच्च ,शरीर संपदा कमावलेल्या तरुणांचा तो चक्री फिरवण्याचा न्यास अहा !

तो तर तू लक्षपूर्वक पहात असतोच ना?

 

आणि हो दहा दिवस मोदक खाऊन तुही कंटाळला असशील ना ?

चल तर मग, भाजलेलं मक्याचं कणीस खाऊ या !

तसा रिवाजच आहे आम्हां नासिककरांचा ,विसर्जन मिरवणुकीत भाजलेलं कणीस लिंबू मीठ लावून खाण्याचा .

 

भद्रकाली आणि मेनरोड सारख्या बाजारपेठातून मिरवणूक जाते तेंव्हा बघ बघे कसे अगदी गर्दी करून एकमेकांना घासत जाऊन आस्वाद घेत असतात.

 

हो,केली होती तक्रार त्या घामट वासाची,त्या आंबट गोड विशिष्ट वासाची,त्याच आता काय ?

 

आज माझे दोनही खांदे आसुसलेत त्या धक्क्यांसाठी, चालू मिरवणुकीत आलेल्या पावसात भिजण्यासाठी,

एम जी रोडवर मांडवात बसून स्वागत करणाऱ्या माझ्या नाशिकच्या होतकरु नेत्यांच्या दर्शनासाठी.

 

मिरवणूक हो मिरवणूकच

मिरवणूक म्हंटली की फक्त बाप्पाचीच असते,आगमनाची आणि विसर्जनाची.

गावातील सर्व प्रतिष्ठित, नेतेमंडळी,लब्ध प्रतिष्ठित आपसातील वाद विवाद सोडून आरके च्या चांदीच्या गणपतीच्या पालखी मागे पायी चालत असतात.

 

हिंदू मुस्लिम हा भेदच राहत नाही.

नासिक ढोल वाजवणारे बहुतेक मुस्लिमच असतात ना रे ?

चित्ररथासाठी सजवलेले टांगे किंवा आकर्षक रोषणाई केलेले टेम्पो/फ्लोट हे प्रामुख्याने त्यांचेच मालकीचे असतात ना रे ?

 

सिंधी बांधवही सामील असतात अगदी पायी चालत मिरवणुकीत,

आग्रहाने सर्वांना सरबत देत असतात,

एरव्ही ही मंडळी आपापल्या उद्योगात व्यस्त असतात पण आज मात्र वेळ काढून मिरवणुकीत सामील असतात की नाही ?.

 

इतकेच काय तर ख्रिश्चन बांधवही जमल्या गर्दीचा फायदा घेऊन छापील मजकूर वाटायला हजर असतात.

 

सर्व धर्म समभाव तो हाच की रे !

 

जातोच आहे विसर्जना, तर एक विनंती करतो आहे तुला,

विसर्जनच व्हावयाचे असेल तर, होऊ दे

विसर्जन ह्या आमच्या अहंपणाचे,

आमच्या ह्या स्वार्थी वृत्तीचे आणि

अकारण भांडखोरपणाचे.आणि हो

दुसऱ्याचे पाय खाली खेचणाऱ्या आमच्या वृत्तीचे.

 

आज खरी गरज आहे ती त्या

सर्वमान्य लोकमान्यांची (स्वमान्य नव्हे हं!)

स्वातंत्र्यपूर्व काळी त्यांनी घरातला बाप्पा चौकात आणून बसवला आणि मना मना वरचे इंग्रजी सत्तेचे मळभ झटकले होते.

आज एक लोकमान्य हवाय हे दुष्काळ आणि तेढी मेढीचे मळभ संपवणारा ,पुन्हा नव्याने जीवन सुरु करणारा.

 

टिळक ऐकताय ना तुम्ही ?

हो,या तुम्हीच !

आणि संपवा ही महामारी एकदाची .

पुन्हा नाचू द्या आम्हाला आगमन आणि निर्गमनाच्या मिरवणुकीत एकत्र जल्लोषात.

होऊ द्या ती आतिषबाजी एल इ डी ची आणि घुमू द्या तो ढोल ताशा ,सम्बल टम्बळ,आणि डीजे ही .

फक्त ते डेसीबल मात्र पाळा गडयांनो !

 

बोला

*”गणपती बाप्पा मोरया”*

 

राजा जोशी

9823687519

प्रतिक्रिया व्यक्त करा