सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता अधिकाऱ्यांनी दुष्काळी उपाययोजना गांभीर्याने व संवेदनशीलतेने कराव्यात. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चाराटंचाईवर आवश्यक उपाययोजना तसेच संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या.
जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तहसील कार्यालय, जत येथे आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जतचे उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रविण धानोरकर, संखच्या अपर तहसिलदार रोहिणी शंकरदास यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये तालुक्यातील पाणीटंचाई व चाराटंचाई, म्हैसाळ योजनेअंतर्गत पाणी सोडण्याबाबतची कार्यवाही, रोहयो अंतर्गत जलतारा, वृक्षलागवड व बांबू लागवड, अतिक्रमणे नियमानुकूल करणे, बळीराजा शेत पाणंद रस्ते, SIR अंतर्गत मतदार यादीचे कामकाज तसेच ई-पीक पाहणी या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंधारणाची कामे, वृक्षलागवड व बांबू लागवड यांना यंत्रणांनी गती द्यावी. तसेच बळीराजा शेत पाणंद रस्त्यांची कामे प्रभावीपणे राबवावीत. अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या प्रकरणांमध्ये नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी SIR अंतर्गत मतदार यादीच्या कामकाजाचा तसेच ई-पीक पाहणीच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच महसूल विभागामार्फत दि. 17 सप्टेंबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवण्याबतच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस जत तालुक्यातील सर्व संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मौजे उटगी येथील दोडनाला तलावाची पाहणी केली. यावेळी तलावातील पाणीसाठा व सद्यस्थितीची पाहणी करण्यात आली. तसेच उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून सद्यस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी बचतीसाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी ग्रामस्थांना केले.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
