बाप्पा घरी आले
आज अंगणात मंगल गंध दरवळला
गणराय आगमनाने परिसर उजळला l
दारी तोरण, ओठांवर बाप्पाचं नाव
आनंदाने भरून गेलं सार गाव l
ढोल-ताशांचा मोठा निनाद झाला
“गणपती बाप्पा मोरया” जयघोष झाला l
फुलांच्या सुगंधाने सजली वाट
बाप्पा आले घेऊन सुखाची पहाट l
सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले
बाप्पांच्या दर्शनाने दुःख सारे मिटले l
नव्या आशेची दिली त्यांनी साथ
आशीर्वादांनी उजळली जीवनाची वाट l
मोदकांचा गोडवा, आरतीचा स्वर
बाप्पांच्या कृपेने प्रसन्न झालं घर l
संकटं सारी दूर जाऊ देत,
सुख-समृद्धीची फुलं फुलू देत l
मनातील इच्छा बाप्पांनी जाणावी
प्रत्येक घरात आनंदाची पालवी यावी l
हात जोडून एवढीच प्रार्थना खास
राहू दे तुमचा आशीर्वाद आसपास l
गणराया आला, आनंद घेऊन आला
भक्तांच्या हृदयात प्रेम दीप लावून गेला l
कवी प्रदीप जोशी, विटे
भ्रमणध्वनी 9881157709
