You are currently viewing सिंधुदुर्ग कन्या पूर्वा गावडेची जलतरण स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी

सिंधुदुर्ग कन्या पूर्वा गावडेची जलतरण स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी

सिंधुदुर्गनगरी :

 

कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने विविध जलतरण क्रीडा प्रकारात 5 रौप्यपदके आणि 2 कांस्य पदकाची कमाई केली आहे. यापुर्वीही भुवनेश्वर व अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरी बद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

16 ते 18 सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर येथील सागर पाटील जलतरण तलाव येथे कोल्हापूर स्विमिंग हब मार्फत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत राज्यभरातून 538 मुले सहभागी झाली होती. त्यात मुली 260 मुले 278 यांचा समावेश होता. या स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी -ओरोस येथील पूर्वा संदीप गावडे हिने घवघवीत यश मिळवत विविध जलतरण प्रकारात उत्कृष्ठ कामगिरी बजावत 5 रौप्य पदके आणि 2 कांस्य पदके मिळविली आहेत.

पूर्वाने जलतरण स्पर्धेत 1500, 800, 400 आणि 200 मीटर फ्रीस्टाईल या चारही प्रकारात दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदके पटकावली. तसेच 200 मीटर बटरफ्लाय मध्येही दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले. तर 100 मीटर बटरफ्लाय व 100 मीटर फ्रीस्टाईल मध्ये तिसरा क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले आहे. तिला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले

ओडिशा-भुवनेश्वर येथे जुलै मध्ये झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर वॉटर पोलो स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर अहमदाबाद येथे झालेल्या 18 वर्षाखालील ज्युनिअर मुलीच्या खेलो इंडिया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतही 200 मीटर बटरफ्लाय मध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर पुन्हा तिने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेतही सातत्य ठेवत यशस्वी कामगिरी बजावली आहे.

पूर्वा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे राहणारी असून ओरोस डॉन बॉस्को व पणदूर स्कुल मध्ये सातवी पर्यत शिक्षण घेतल्यानंतर पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्याकडून जलतरण चे प्रशिक्षण घेत आहे. त्यापूर्वी सिंधुदुर्गनगरी व जलतरण तलावात प्रवीण सुलोकार व दीपक सावंत यांच्याकडून प्रशिक्षण घेत होती. सध्या पुणे येथे ती दहावी मध्ये शिक्षण घेत जलतरणचे प्रशिक्षण घेत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 16 =