भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नुतनीकरण अर्जास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा
सिंधुदुर्ग,
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नुतनीकरण (Renewal) अर्जांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर विहित मुदतीत अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा आणि इयत्ता ११ वी, १२ वी किंवा १२ वी नंतरच्या व्यावसायिक अथवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी संबंधित महाविद्यालयात प्रवेशित असावा. विद्यार्थ्याने मागील अभ्यासक्रमात ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही गुणांची अट ४० टक्के आहे.
सन २०२५-२६ मध्ये स्वाधार योजनेसाठी अर्ज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ मध्ये नुतनीकरण (Renewal) अर्ज भरताना मागील वर्षाचे गुणपत्रक ऑनलाइन अपलोड करणे तसेच चालू अभ्यासक्रमाची माहिती अद्ययावत (Update) करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन भरलेल्या अर्जाची PDF प्रत आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज दि. २ ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत नजीकच्या मुलांचे/मुलींचे शासकीय वसतिगृह, संबंधित महाविद्यालय किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात समक्ष अथवा टपालाद्वारे सादर करावा.
जिल्ह्यातील संबंधित महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरून पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या नुतनीकरण अर्जास दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज भरण्यासाठी सूचित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वाधार योजनेचा ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास अंतिम मुदतीपूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ०२३६२-२२८८८२ या दूरध्वनी क्रमांक संपर्क साधावा.
