You are currently viewing ‘आईच्या काळजातून’ व्याख्यानातून उलगडली मातृत्वाची महती

‘आईच्या काळजातून’ व्याख्यानातून उलगडली मातृत्वाची महती

पुणे / पिंपरी : सुखवाणी क्लासिक सोसायटी, पिंपरी येथे गणेशोत्सवानिमित्त मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी ‘आईच्या काळजातून’ या विषयावर प्रबोधनकार, व्याख्यात्या व सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार मा. शारदाताई मुंढे यांच्या प्रभावी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या ओघवत्या आणि भावस्पर्शी शैलीत त्यांनी आईच्या ममतेचे, त्यागाचे आणि संस्कारांचे विविध पैलू उलगडून उपस्थित रसिकांची मने जिंकली.

याप्रसंगी कर्मयोगिनी महिला संस्थेच्या वतीने संस्थापिका-अध्यक्षा सौ. सीमा शिरीष गांधी यांच्या हस्ते मा. शारदाताई मुंढे यांचा सन्मान करण्यात आला.

आपल्या व्याख्यानात शारदाताई मुंढे यांनी जिजाऊ माँसाहेबांपासून रामायण आणि महाभारतातील विविध मातृत्वाच्या उदाहरणांपर्यंत अनेक संदर्भ देत आईचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान अधोरेखित केले. आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नसून संस्कार, त्याग, माया, धैर्य आणि जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे, हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिले. त्यांच्या भावपूर्ण विवेचनाने आणि उदाहरणांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ खोपडे यांनी केले. त्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोसायटीतील सर्व नागरिकांचे सहकार्य लाभले. संतोष कदम यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा