मेफॅड्रीन (एमडी) ड्रगची आंतरराष्ट्रीय तस्करी
विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
मेफॅड्रीन (एमडी) ड्रगची आंतरराष्ट्रीय तस्करी सांगली पोलीसांनी उघडकीस आणली. ३८ लाख ६० हजाराचा अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. संशयितासह केरळच्या दोघाविरूध्द विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक दोशी व अप्पर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांच्या आदेशाने जिल्ह्यातील अमली पदार्थ विरोधी मोहिम तीव्र करण्यात आली आहे. यासाठी गुन्हे शाखेचे पथक कार्यरत असताना सहायक निरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक महादेव पोवार, सुर्यकांत साळुंखे यांना विटा तासगाव मार्गावरील श्री मंगल कार्यालयासमोर संशयित अमली पदार्थ विक्रीसाठी मोटारीने येत असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलीसांच्या पथकाने घटनास्थळी जाउन पाहिले असता संशयित दत्तात्रय अंकुश पाखरे (वय ३२, रा.हिवरे, ता. खानापूर) हा मारूती अल्टो मोटारीसह (एमएच १० ई ई ६०५४) उभा होता. पोलीसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेउन वाहनाची झडती घेतली असता चालक आसनाखाली प्लास्टिक पिशवी आढळली. यामध्ये ९६५ ग्रॅम एमडी पावडरचा साठा मिळून आला. बाजारात प्रतिग्रॅम चार हजार रूपये दराने ही भुकटी विकली जाते. गाडीच्या सामानकक्षामध्ये रिकाम्या कॅप्सूलची पिशवीही मिळाली. पोलीसांनी ३८ लाख ६० हजाराची एमडी भुकटी, दोन मोबाईल, अल्टो मोटार असा ४२ लाख ८२ हजाराचा ऐवज जप्त केला आहे.
