शासकीय आयुष रुग्णालयात दररोज सकाळी मोफत स्त्रीरोग सेवा; दोडामार्गात सायंकाळी खासगी ओपीडी
सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे माजी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे हे सेवानिवृत्तीनंतर आता गोवा शासनाच्या धारगळ येथील शासकीय आयुष रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून रुजू झाले आहेत. त्यांच्या या सेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग परिसरातील महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
धारगळ येथील शासकीय आयुष रुग्णालयात गरोदर मातांची तपासणी, प्रसूती तसेच गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया आदी सर्व सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. ही सेवा रविवार वगळता दररोज सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत सुरू असते. ज्या रुग्णांना तपासणी किंवा शस्त्रक्रिया करायची आहे, त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत रुग्णालयात पोहोचावे, जेणेकरून सोनोग्राफी व रक्त तपासणी त्याच दिवशी वेळेत होऊ शकेल.
याशिवाय डॉ. ऐवाळे हे रविवार सोडून दररोज सायंकाळी ५ ते ८ या वेळेत दोडामार्ग शहर बाजारपेठ येथे खासगी ओपीडीच्या माध्यमातूनही रुग्णसेवा देत आहेत.
डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांच्या अनुभवाचा लाभ सिंधुदुर्गातील, विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग परिसरातील महिला रुग्णांना मिळणार असल्याने या भागातील महिलांसाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
