*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक पंकज प्रदीप अंबिके लिखित अप्रतिम कथा*
अस्थिर जगाचं वास्तव
१ सप्टेंबर २०२४ च्या आसपासची गोष्ट… ऑफिसमध्ये एका नवीन मुलीचे जॉइनिंग झाले. तिचे नाव होते अंवतिका.
मी त्या ऑफिसमध्ये जवळपास सात वर्षांपासून काम करत होतो. ऑफिसमधील कामाची पद्धत, माणसे, ग्राहक आणि मालकाशी कामाचे संबंध—या सगळ्याची मला चांगलीच सवय झाली होती. काही कामांची महत्त्वाची सूत्रेही माझ्या हातात होती. पण अंवतिका आली आणि परिस्थिती हळूहळू बदलू लागली, वयाने ती माझ्यापेक्षा बरीच लहान होती;
मात्र तिच्या हातात कामाची बरीच सूत्रे देण्यात आली. हे माझ्या मनाला कुठेतरी लागले. ज्या कामासाठी मी पगारवाढ मागत होतो, त्याच कामापासून आता मला दूर केले जात आहे, अशी भावना मनात निर्माण झाली. “आपले महत्त्व आता कमी होणार तर नाही ना?”
हा प्रश्न माझ्या मनात घर करून बसला. आणि तिथूनच अंवतिका बद्दलची माझ्या मनात असूया निर्माण झाली.
खरं तर माझ्या असूयेचा संबंध अंवतिका या व्यक्तीशी कमी आणि माझ्या परिस्थितीशी जास्त होता. महागाई वाढत होती. घरातील जबाबदाऱ्या वाढत होत्या. खर्च वाढत होते. अशा परिस्थितीत आपल्या कामाचे महत्त्व कमी होणे ही कल्पनाच मला अस्वस्थ करत होती.
आत्तापर्यंत ऑफिसमधील अनेक कामे आणि मालकाशी थेट कामाचे संबंध माझ्याकडे होते. अचानक माझ्यासमोर माझाच एक प्रकारचा ‘प्रतिस्पर्धी’ येऊन उभा राहिल्यासारखे मला वाटू लागले.
पण अंवतिका कदाचित मला प्रतिस्पर्धी समजतच नव्हती. तिच्या कुटुंबाची कंपनीतील लोकांशी आधीपासूनच ओळख होती. त्यामुळे ऑफिसमधील माणसांमध्ये मिसळताना तिला कुठलाही वेगळेपणा जाणवत नव्हता.
माझ्यापेक्षा तिची ओळख अनेकांशी आधीपासूनच होती. आणि कदाचित हीच गोष्ट मला सर्वात जास्त खटकत होती. प्रत्येक दिवस जणू विषाचा घोट प्यावा तसा वाटू लागला. त्यातच अंवतिका माझे काम तपासणार, अशी जबाबदारीही तिला देण्यात आली, ती तिचे काम करत होती.
पण माझा अहंकार दुखावत होता. मला वाटत होते की, सात वर्षे काम केल्यानंतर आता माझ्यावरच कोणीतरी लक्ष ठेवणार? हळूहळू माझ्या मनातील नकारात्मकता वाढत गेली.
एकदा अंवतिका काही कारणामुळे आठ दिवस ऑफिसला आली नाही. ती येणार नाही हे समजल्यावर मला मनापासून आनंद झाला. “कदाचित आता ती परत येऊच नये…” अशी भावना माझ्या मनात आली.
आज विचार केला तर त्या भावनेची मला स्वतःलाच लाज वाटते.
कारण त्या काळात मला एक गोष्ट समजलीच नव्हती—
मी अंवतिका विरोधात नव्हतो, मी स्वतःच्या भीतीविरुद्ध लढत होतो, पण त्या भीतीचा राग मात्र अंवतिका वर निघत होता. या सगळ्या मानसिक अवस्थेत माझ्या स्वतःच्या कामाबद्दलही मी नकारात्मक होऊ लागलो.
अनेक लोकांशी मी कामाबद्दल नकारात्मक बोलत राहिलो. आणि वेळ पुढे सरकत राहिला… मी जवळपास महिनाभर अंवतिका सोबत बोललोच नाही.
पण इथे एक गोष्ट खरी होती—अंवतिका देखील काही वेळा चुकत होती. कोणती गोष्ट कोणाला सांगायची आणि कोणती गोष्ट सांगायची नाही, याचे भान तिला नेहमी राहत नव्हते. त्यात ऑफिसमधील राजकारणाची किनारही होती. या सगळ्यात मात्र एक गोष्ट निश्चित झाली होती—माझ्या आयुष्यातील शांतता हरवली होती.
अंवतिका कडे स्वतःची गाडी नव्हती. त्यामुळे ऑफिस सुटल्यानंतर मी तिला चौकात सोडत असे.
तो मदतीचा हेतू होता की, तिच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न होता, की तिने ऑफिसमधील बारीकसारीक गोष्टी वरिष्ठांना सांगू नयेत अशी मनातील भीती होती—हे आजही मला ठामपणे सांगता येत नाही.
पण एक दिवस असा आला की, महिनाभर न बोलण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंवतिका त्या स्टॉपवर एकटीच बसलेली दिसली. मी गाडीवरून पुढे निघून गेलो. पण काही अंतर गेल्यावर मनात विचार आला—
“एकटी मुलगी आहे… तिथे बसणे सुरक्षित नाही.” माझ्या मनातील रागापेक्षा माणुसकी मोठी ठरली.
दुसऱ्या दिवशी मी पुन्हा अंवतिका सोबत बोलायला सुरुवात केली. तिला गाडीवरून सोडायलाही लागलो.
मला वाटले, कदाचित आता सगळे पूर्वीसारखे होईल, पण गैरसमजांना कधी कधी एक छोटासा क्षण पुरतो.
एक दिवस ऑफिस सुटल्यानंतर अंवतिका थोडा वेळ ऑफिसमध्ये थांबली. माझे आधीचे अनुभव डोळ्यासमोर होते. माझ्या मनात लगेच विचार आला—”बहुतेक माझ्याबद्दल काहीतरी सांगण्यासाठीच थांबली असेल.”
आणि त्या विचारावर विश्वास ठेवून मी तिथून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी मात्र समजले की, तसे काहीच नव्हते.
पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्या एका क्षणाने पुन्हा एक गैरसमज जन्माला घातला, त्यानंतर अंवतिका स्वतःची गाडी घेऊन ऑफिसला येऊ लागली. कदाचित दोघांच्याही मनात प्रश्न होते, पण उत्तर शोधण्यासाठी संवाद नव्हता.
आणि इथेच या गोष्टीचा सर्वात मोठा धडा दडला आहे—
गैरसमज माणसाला एका दिवसात संपवत नाही; तो हळूहळू नाती, विश्वास आणि मनःशांती संपवत जातो.
कधी कधी समोरची व्यक्ती आपली शत्रू नसते. आपली भीती, आपला अहंकार, आपली असुरक्षितता आणि आपले अपूर्ण संवाद—हेच आपले खरे शत्रू असतात.
अंवतिका आली म्हणून माझे महत्त्व कमी झाले नव्हते, पण माझ्या मनाने तसा अर्थ काढला आणि त्या एका चुकीच्या अर्थाने माझ्या अनेक दिवसांची शांतता हिरावून घेतली.
कदाचित अंवतिका चुकीची नव्हती…
कदाचित मीही पूर्णपणे चुकीचा नव्हतो…
चूक होती ती परिस्थितीला समजून न घेता मनाने तयार केलेल्या गैरसमजाची.
पण आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. माझ्याकडून एखाद्या कामात चूक झाली, तरी ती मला फोन करून लगेच सांगते—“ही चूक दुरुस्त करा.” तिच्या त्या साध्या बोलण्यात आता मला कोणतीही भीती वाटत नाही. पूर्वी मनात निर्माण झालेली ती काल्पनिक भीती आता पूर्णपणे संपली आहे.
कारण आता मला या अस्थिर जगाचं वास्तव समजलं आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कायमची आपल्या सोबत राहीलच असं नाही. काही माणसं आपल्या आयुष्यात काही काळासाठी येतात, आपल्याला काहीतरी शिकवून जातात आणि मग काळाच्या प्रवाहात दूर निघून जातात.
✒️पंकज प्रदीप अंबिके
बारामती
