हेमलकसा भामरागड –
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी युवकांना जागे करण्यासाठी अमरावतीच्या मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील गावागावात विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन जी जनजागृती प्रारंभ केली आहे की निश्चितच आदिवासी युवकांना दिशा दाखविणारी आहे. त्यांच्या या स्पर्धा परीक्षा कार्यशाळांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयक गोडी निर्माण होऊन ते स्पर्धा परीक्षेकडे वळतील. मिशन आयएएसने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल मिशन आयएएस निश्चितच अभिनंदनास पात्र आहे असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी हेमलकसा येथे काढले. मिशन आयएएस व आदिवासी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळा विविध आश्रम शाळा व विविध वस्तीगृहे येथे 31 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन त्याचा संक्षिप्त अहवाल पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना सादर केला असतांना त्यांनी हे गौरव उद्गार काढले आहेत. याप्रसंगी डॉक्टर मंदाकिनी आमटे ह्या उपस्थित होत्या.
सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री राहुल रेखावार सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असलेले आयएएस अधिकारी श्री उदय चौधरी आयएएस अधिकारी श्री विजय राठोड सनदी अधिकारी सचिन ओंबासे तसेच आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती श्री नंदू भाऊ नरोटे व मार्गदर्शक श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने मिशन संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी गडचिरोली जिल्ह्यात 168 विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यासाठी त्यांनी कोणतेही मानधन आकारले नाही ही बाब लक्षात घेऊन श्री प्रकाश बाबा आमटे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावर्षी मिशन आयएएसने पुढाकार घेऊन आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती श्री नंदू भाऊ नरोटे यांच्या पुढाकाराने वडसा देसाईगंज बामणी शिरोंचा मन्ने राजाराम ताडगाव कोरची कोटरा बोरी झेंडेपार कोटगूल ग्यारापत्ती सावरगाव मुरूमगाव येरमागड एटापल्ली अहेरी आलापल्ली या दुर्गम भागात असणाऱ्या आश्रम शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयक जाणीव निर्मिती केली.
पावसाळी वातावरण असल्यामुळे मिशन आयएएसच्या टीमला बऱ्याच अडचणी आल्या. प्रसंगी छत्तीसगडमध्ये जाऊन महाराष्ट्रात परत यावे लागले. चिखलात कार फसल्यामुळे की ढकलत न्यावी लागली पण त्यावर मात करून हा संपूर्ण सात दिवसाचा कार्यक्रम मिशन आय ए एस ने आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने पार पाडला.
श्री प्रकाश बाबा आमटे यांचे आशीर्वाद मिशन आयएएसला लाभल्याबद्दल सर्व स्तरातून मिशनच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीच्या काळात मिशनने 137 स्पर्धा परीक्षा कार्यशाळा गडचिरोली जिल्ह्यात घेऊन एक विक्रम केला आहे. इतक्या मोठ्या संख्येने गडचिरोली सारख्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यशाळा घेणारी मिशन आयएएस ही भारतामधील पहिली संस्था आहे. दिवाळी नंतर देखील उर्वरित आश्रम शाळांमध्ये विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यात येतील असा मनोदय आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती श्री नंदूभाऊ नरोटे यांनी व्यक्त केली आहे.
या कार्यशाळा घेण्यासाठी पहिली विधानसभेचे आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांचे सहकार्य लाभले असून त्यांनी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे विषयीचे पुस्तके मोठ्या प्रमाणात स्कूल बॅग चांगल्या प्रतीचे प्रत्येकी दोन नोटबुक व एक कंपास हे साहित्य मोठ्या प्रमाणात वितरित करून या उपक्रमाला हातभार लावला आहे. विशेष म्हणजे त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री नागेश मडावी हे दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते.
