सातारा / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
वाढदिवस म्हटले की मित्रमैत्रिणींना खाऊ वाटप, केक आणि विविध प्रकारे खर्च करण्याची प्रथा आहे. मात्र, ‘आपल्या आनंदात गरजूंचाही आनंद सामावला पाहिजे’ या विचारातून रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर, सातारा येथील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या कु. विदिशा विपुल कुलकर्णी हिने आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविला.
वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्या ऐवजी त्यासाठी होणारा खर्च एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या उपयोगी पडावा, या उद्देशाने विदिशाने रयत शिक्षण संस्थेच्या शाहू बोर्डिंग शाखा क्र. १ या वसतिगृहात राहणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्टीलच्या दोन बाटल्या भेट दिल्या.
रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिरमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी आणण्यास सक्तीने बंदी असून, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व सुरक्षित पर्याय म्हणून स्टीलच्या बाटल्यांचा वापर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे विदिशाने दिलेली ही भेट संबंधित विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या शाहू बोर्डिंग शाखा क्र. १ मध्ये महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना विनामूल्य शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. विविध अडचणींवर मात करत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा विदिशाचा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरला.
वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च न करता गरजू विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी वस्तू देण्याचा विदिशाचा निर्णय हा सामाजिक संवेदनशीलता, पर्यावरणप्रेम आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम आहे. वय लहान असले तरी विचार मोठा असतो, हेच विदिशाच्या या उपक्रमातून दिसून आले.
वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजू विद्यार्थ्यांसोबत वाटून घेण्याची ही संकल्पना इतर विद्यार्थ्यांनीही अनुकरण करावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विदिशाच्या या उपक्रमाचे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून कौतुक होत आहे.
‘खाऊपेक्षा उपयोगी वस्तूची भेट आणि खर्चापेक्षा मदतीचे समाधान’ असा संदेश देणारा विदिशाचा हा वाढदिवस निश्चितच समाजासाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
फोटोसाठी कॅप्शन:
सातारा : वाढदिवसानिमित्त रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिरच्या इयत्ता चौथीतील कु. विदिशा विपुल कुलकर्णी हिने शाहू बोर्डिंग शाखा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्टीलच्या बाटल्यांची भेट दिली.
