दृष्टिबाधितांच्या प्रश्नांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले
राजभवनात ‘अंध ध्वज दिन निधी’ उद्घाटन; NAB पदाधिकाऱ्यांनी मांडल्या विविध अडचणी
मुंबई । प्रतिनिधी :
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) युनिट महाराष्ट्र, नाशिक यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील NAB संस्थांचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजभवन, मलबार हिल येथे ‘अंध ध्वज दिन निधी’ उद्घाटन समारंभ पार पडला. राज्यपाल श्री. जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी NAB युनिट महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. रामेश्वर कलंत्री, सचिव श्री. गोपी मयूर, सहसचिव श्री. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री. अनंत व्यंकटेश उचगावकर, तसेच श्री. भावेश भाटिया यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान दृष्टिबाधित व्यक्तींना भेडसावणाऱ्या विविध अडचणी तसेच NAB संस्थेला येणाऱ्या अडचणींबाबत राज्यपाल श्री. जिष्णुदेव वर्मा यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी मांडलेले सर्व प्रश्न राज्यपालांनी शांतपणे समजून घेतले. तसेच या प्रश्नांकडे कर्तव्याच्या भावनेतून विशेष लक्ष देण्याचे आश्वासन देत NAB संस्थेला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यपालांसोबत झालेली ही भेट दृष्टिबाधित बांधवांच्या प्रश्नांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि फलदायी ठरल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी NAB चे श्री. भावेश भाटिया यांनी शेर-शायरीच्या माध्यमातून राज्यपालांचे आभार मानले. तसेच NAB सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. अनंत व्यंकटेश उचगावकर यांनी आपला परिचय करून देत सावंतवाडी येथील संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण राज्यपालांना दिले.
दृष्टिबाधितांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल राज्यपाल श्री. जिष्णुदेव वर्मा यांचे NAB पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
