You are currently viewing हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये कुत्रे, मांजरींच्या वावरावर कारवाई करा

हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये कुत्रे, मांजरींच्या वावरावर कारवाई करा

हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये कुत्रे, मांजरींच्या वावरावर कारवाई करा

अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची राजेंद्र मसुरकर यांची मागणी; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांच्या जेवणाच्या ठिकाणी तसेच किचन परिसरात कुत्रे, मांजरी यांचा वावर होत असल्याची बाब गंभीर असून, यामुळे अन्न स्वच्छता व ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी जिल्हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, काही हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये पाळीव कुत्रे व मांजरी ग्राहकांच्या टेबलांजवळ तसेच किचन परिसरात फिरताना आढळतात. त्यामुळे ग्राहकांना त्रास होण्याबरोबरच प्राण्यांच्या अंगावरील केस, जंतू, लाळ आदींमुळे अन्न दूषित होण्याची शक्यता आहे. तसेच प्राण्यांकडून चावा घेतला गेल्यास रेबीजसारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचीही तपासणी करण्याची मागणी
हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये अपायकारक रंग किंवा इतर पदार्थांचा वापर केला जात नाही ना, याचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी मसुरकर यांनी केली आहे. तसेच हॉटेलमधील कर्मचारी व मालकांची आरोग्य तपासणी, पेस्ट कंट्रोल तसेच खाद्यपदार्थांचे प्रयोगशाळेत परीक्षण यासंबंधीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.
आठ दिवसांत कारवाई न झाल्यास वरिष्ठांकडे धाव
अन्न सुरक्षा नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज व्यक्त करताना मसुरकर यांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेल्या कारवाईचे कौतुक केले. याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी करून संबंधितांना प्रथम नोटीस देऊन नियमांनुसार योग्य ती कारवाई करावी. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र मसुरकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा