You are currently viewing डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार… पोलिसांचा आंबोली- चौकुळ येथील डार्क फॉरेस्ट हॉटेलवर छापा

डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार… पोलिसांचा आंबोली- चौकुळ येथील डार्क फॉरेस्ट हॉटेलवर छापा

स्थानिक व्यावसायिकांना त्रास देण्याचा प्रयत्न…. लोकांचा आरोप

संपादकीय….

सोमवारी रात्री ९.०० वाजता आंबोली-चौकुळ मार्गावर जंगलमय भागात असणाऱ्या डार्क फॉरेस्ट या स्थानिकांनी सुरू केलेल्या हॉटेलवर पोलिसांनी टाकलेला छापा म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्याचाच प्रकार असल्याचे समोर येत आहे. एकीकडे सावंतवाडीतील दुहेरी खून प्रकरणात पोलिसांची वाहवा करणारे लोकच चौकुळ येथील हॉटेलवरील धाड प्रकरणात पोलिसांच्या कामगिरीवर ताशेरे ओढताना दिसत आहेत, त्यामुळे स्थानिक उद्योजकांच्या प्रगतीवर घाव घालणारी कामगिरी करून पोलिसांनी नक्की काय साध्य केले असा सवाल उपस्थित होत आहे.
चौकुळ येथील निसर्गरम्य वातावरणात माळरानावर तीन भाऊ मिळून डार्क फॉरेस्ट हे हॉटेल सुरू केले आहे. गोवा येथे हॉटेल व्यवसायात असणाऱ्या भावाच्याच मदतीने चौकुळ येथे अतिशय सुरेख गार्डन आदी व्यवस्था करत स्थानिक असणाऱ्या युवकांनी मोठ्या कष्टाने, मेहनतीने हॉटेलचा डोलारा उभा केला आणि अल्पावधीतच देशाच्या कानाकोपऱ्यात हॉटेलचे नाव गेले. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून खऱ्या अर्थाने प्रगती करत असल्याचे त्यामुळेच दिसू लागले होते. हॉटेलची होणारी प्रसिद्धी आणि सेवा यामुळेच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची पावले आंबोली चौकुळ कडे वळायला लागली आहेत. आपल्या गावात कोणीतरी स्थानिक व्यक्ती प्रगती करत आहे त्याचा पाय ओढण्याशिवाय उद्योग नसणाऱ्या कोणीतरी जिल्हा पोलिस अधीक्षकांना डार्क फॉरेस्ट हॉटेलवर परप्रांतीय युवती आणून धिंगाणा घालत असल्याची टीप दिली, त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुखांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कटेकर यांना सापळा रचून छापा टाकण्यास पाठविले. हॉटेलच्या रूम मध्ये छापा टाकून त्यात ३४ जणांना अटक करण्यात आली, त्यातील ५ स्थानिक व २९ आंध्रप्रदेश येथील व्यक्तींचा समावेश आहे. यात एकूण ४७ हजार ७५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून परवाना नसताना मद्य बाळगणे, मद्य पिणे, अश्लील हावभाव करत धिंगाणा घालणे, कोविड नियमांचे उल्लंघन करणे आदी कलमे लावून अटक करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, आंध्रप्रदेश येथील एका कंपनीतील कर्मचारी ज्यात काही पुरुष, विवाहित स्त्रिया, युवती असे जवळपास २९ जण संपूर्ण हॉटेल बुक करून टूर वर आले होते. कंपनीची बस असल्याने हॉटेल मालकाने त्यांनी काय सामान आणले याची तपासणी केली नाही किंवा तशी तपासणी कुठल्याही हॉटेलवर करत असल्याचे ऐकिवात देखील नाही. हॉटेलच्या बंद खोलीत हे पर्यटक नाच गात असल्याने हॉटेल मालकाने देखील त्यांना बंधन घातले नाही. रात्री ९.०० वाजता पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी त्या पर्यटकांकडे देशी दारू आढळून आली होती. त्यामुळे दारू बाळगणे, अश्लील हावभाव करत धिंगाणा घालणे, कोविड नियमांचे उल्लंघन, अशी कलमे लावून त्यांना अटक करण्यात आली. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक हॉटेलवर आले होते. ८.०० वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होता, परंतु तात्काळ ९.०० वाजता बांदा येथून येत पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून आपली कार्यतत्परता दाखवून दिली.
एका माळरानावर आपल्याच स्थानिक युवकांचे मोठ्या कष्टाने उभारलेले हॉटेल मोठ्या दिमाखात चालते, कोणीतरी सुशिक्षित बेरोजगार बेकार न राहता प्रगती करतो याचा पोटशूळ उठल्याने समांतर धंद्यातील स्पर्धकांनी पाय ओढण्यासाठी कारस्थान करत हॉटेलची बदनामी व्हावी आणि युवकांचे मनोध्येर्य खच्चीकरण करण्यासाठी खोटी टीप जिल्हा पोलिस अधीक्षकांना देत डार्क फॉरेस्ट हॉटेलवर छापा टाकण्यास प्रवृत्त केले. जिल्ह्याच्या कार्यतत्पर पोलिसांनी आपली कामगिरी चोख बजावली, परंतु एकंदरीत सर्व प्रकार पाहता पोलिसांची कामगिरी म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढण्याचाच प्रकार असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे लोकांनी देखील पोलीस कारवाईवर बोट दाखवत शेरेबाजी करत नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यात अशी कितीतरी हॉटेल्स आहेत, जिथे दारू पुरवली, विकली जात नाही परंतु दारू पिण्यास बंदी नसते. असे हायवेवर अनेक ठिकाणी परप्रांतीय लोकांचे धाबे आहेत जिथे विना परवाना दारू पिली जाते परंतु त्यावर पोलिसांकडून कधी कारवाई झालेली दिसून येत नाही. परंतु स्थानिक तरुणांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या उद्योगात कोणतीही शहानिशा न करता कोणाच्यातरी टीप वरून सापळा रचून कारवाई केली जाते. गोव्यातून गाड्या भरून दारू जिल्ह्यात येते, वितरण विक्री होते, चरस गांजा अफू आदी जिल्ह्यात सर्रासपणे मिळू लागले आहे, त्यावर कधीतरी नाममात्र कारवाई होऊन प्रकरणे दाबली जातात, या अशा प्रकरणात स्थानिक नसून परप्रांतीय लोकांचाच भरणा असतो, परंतु त्यावर कारवाई होताना दिसत नाही उलट सरळमार्गाने व्यवसाय करणाऱ्या स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो आणि त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते हे नक्कीच शोभिवंत नाही.
जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी पोषक असे उद्योग स्थानिक उभारत असतानाच त्यांचे होणारे खच्चीकरण हे जिल्ह्याच्या प्रगतीच्या दृष्टीने नक्कीच भूषणावह नाही. सावंतवाडीचे आमदार आणि पर्यटन वाढीसाठी नेहमीच आग्रही असणारे माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत यांनी याची दखल घेऊन चुकीच्या दृष्टीने होणाऱ्या गोष्टींना बंधने घालावीत, अन्यथा जिल्ह्यात येणारे पर्यटक जिल्ह्यात न येता जीवाचा गोवा करत जिल्ह्याला पाहताच रवा म्हणून सांगत टाटा बाय बाय करतील यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा