You are currently viewing पुढारी दिसले, कार्यकर्ते दिसले, पण..

पुढारी दिसले, कार्यकर्ते दिसले, पण..

पुढारी दिसले, कार्यकर्ते दिसले, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही..

पोलिस दिसले, नेते दिसले, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही..

स्टेज दिसले, डिजे दिसले पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही..

गर्दी होती, दर्दी दिसले, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही..

हंड्या होत्या, थर दिसले, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही..

सभ्य भेटले, दारुडे पण दिसले, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही..

फ्लेक्स होते, बॅनर दिसले, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही…

देखावे होते, झगमगाट दिसला, पण…
कृष्ण कुठे दिसलाच नाही…

भपका होता, उधळण दिसली, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही…

गॉगल होते, टीशर्ट दिसले, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही…

पोरं होती, पोरीही उतरल्या, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही…

कॅमेरा होते, माईकवाले दिसले, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही…

मग अचानक लक्षात आलं की, का..
कृष्ण कुठे दिसलाच नाही…

टीव्हीवर दिसला संजू बाबा, तोच अतिरेक्यांची हत्यार बाळगून तुरुंगात जाऊन आलेला, तो पण कृष्णाच्या वाढदिवसाला आला होता, पण कृष्ण स्वतःच तिथे नव्हता…

मग दिसली सब से कातील, नितंब हलवत, बेंबी दाखवत नाचणारी.. नाचताना इशारे करत, बाळ गोपाळांना पेटवणारी,
ती एकदम झोकात होती पण कृष्ण तिथेही नव्हता..

ह्या सगळ्या गोंगाटात आणि संपणाऱ्या संस्कृतीत उरलेली एक आजी होती..

नऊवारी नेसलेली, देव्हाऱ्यासमोर उभी असलेली, हाताने वळलेल्या वातीचा दिवा लावून, बाळकृष्णाला पाळणा म्हणणारी, स्वतः दही घुसळून काढलेलं शुभ्र लोणी, छोट्याश्या वाटीत नैवेद्याला ठेऊन थरथरते हात जोडणारी.
तिच्या निरंजनाच्या प्रकाशात तो देव्हाऱ्यात उभा होता, आजीचा तेजःपुंज कान्हा..तिच्या भक्तीला साद देत बासरी वाजवत होता….दिवसभर कृष्ण तिथून हललाच नाही…

बाकी सर्वत्र भपका, गोंगाट, ढासळती संस्कृती आणि अमाप खर्च होता, पण..
कृष्ण कुठे दिसलाच नाही…
©️मंदार जोग
*संग्रह # अजित नाडकर्णी, शुभांजित श्रुष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा