You are currently viewing ‘माधुरी’ला १३ सप्टेंबरपूर्वी नांदणी मठात आणा

‘माधुरी’ला १३ सप्टेंबरपूर्वी नांदणी मठात आणा

मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजू शेट्टींचे निवेदन

नांदणी ( प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार )

शिरोळ तालुक्यातील वृषभांचल येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची हत्तीण ‘माधुरी’ हिला १३ सप्टेंबर २०२६ पूर्वी नांदणी मठात परत आणावे, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संवेदनशील प्रकरणात राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हाय पॉवर कमिटी व वन विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.माधुरीला गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ येथे नेऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. या घटनेमुळे सांगली, कोल्हापूर, उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्रातील लाखो जैन श्रावक-श्राविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी समाजाने आंदोलनासोबत न्यायालयीन लढाही दिला आहे.दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी नांदणी मठात प्रथमाचार्य १०८ श्री शांतिसागरजी महाराज यांची ७१ वी पुण्यतिथी तसेच त्यांच्या ऐतिहासिक चातुर्मासाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘चातुर्मास शताब्दी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र व कर्नाटकातून दोन लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.या ऐतिहासिक कार्यक्रमात व्यसनमुक्ती रॅली, महामस्तकाभिषेक आणि आचार्य श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक होणार आहे. या धार्मिक परंपरेत माधुरीला अग्रक्रमाचा मान असल्याने तिची अनुपस्थिती भाविकांना निश्चितच खटकणारी ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर माधुरी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल संबंधित यंत्रणांकडे सादर करण्यात आला असून, नांदणी मठातील तिच्या संगोपनाच्या सुविधांची शासकीय समितीने पाहणीही केल्याचे निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे आता विलंब न करता माधुरीला सुरक्षितपणे नांदणीला आणण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी भावनिक मागणी शेट्टी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा