मिरज / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार)
मिरज शहरातील कृष्णा घाट परिसर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त (आरोग्य व स्वच्छता) स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुख्य स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वच्छता अधिकारी सचिन वाघमोडे यांच्या पथकाने मोहिमेचे प्रभावी नियोजन करून स्वच्छता कामकाजाची अंमलबजावणी केली.
या विशेष मोहिमेदरम्यान कृष्णा नदीकाठ, घाट परिसर, विसर्जन स्थळ तसेच परिसरातील आवश्यक ठिकाणी साचलेला कचरा व निर्माल्य गोळा करून परिसराची स्वच्छता करण्यात आली.
नदीकाठचा परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच घाट परिसरातील स्वच्छता व्यवस्थित करून घेण्यात आली. नागरिकांची व भाविकांची वर्दळ लक्षात घेऊन परिसर स्वच्छ, सुटसुटीत आणि सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या.
विशेष स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिरज विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक व मुकादम उपस्थित राहून स्वच्छता कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी, देखरेख आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने कार्यवाही करीत होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नदीकाठ व घाट परिसरातील कचरा आणि निर्माल्य संकलित करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करण्यात आली.
कृष्णा घाट हा नागरिक तसेच भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर असल्याने त्याची स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. नदीकाठावर कचरा व निर्माल्य साचू नये, परिसराचे सौंदर्य अबाधित राहावे आणि नागरिकांना स्वच्छ वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी स्वच्छता यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कृष्णा नदीपात्र, घाट परिसर आणि विसर्जनस्थळी कचरा टाकू नये. निर्माल्य व इतर पूजासाहित्य निर्धारित ठिकाणीच जमा करावे आणि नदी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.
महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांच्या निर्देशानुसार शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, देखरेख आणि प्रभावी स्वच्छता व्यवस्थापन यावर प्रशासनाकडून सातत्याने भर देण्यात येत आहे.
