You are currently viewing गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत प्लास्टिकविरोधी धडक कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत प्लास्टिकविरोधी धडक कारवाई

१८ आस्थापनांची तपासणी; ७ आस्थापनांना २७ हजारांचा दंड, ४ किलो प्लास्टिक जप्त

सांगली ( प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार ) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उत्सवाला चालना देण्यासाठी आणि नियमबाह्य प्लास्टिक कॅरीबॅग व थर्मोकोलच्या वापरास आळा घालण्यासाठी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग समिती क्र. १ कार्यक्षेत्रात विशेष तपासणी व दंडात्मक कारवाई मोहीम राबविण्यात आली.

उपायुक्त (आरोग्य व स्वच्छता) स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखाली, मुख्य स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वच्छता अधिकारी अतुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पेट भाग, वखार भाग, गणपती पेठ आणि व्यापारी क्षेत्र या परिसरात विविध आस्थापनांची तपासणी केली.

या विशेष मोहिमेदरम्यान एकूण १८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये नियमबाह्य प्लास्टिक कॅरीबॅग व संबंधित बंदी असलेल्या साहित्याचा वापर आढळून आलेल्या ७ आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत संबंधित आस्थापनांकडून एकूण ₹२७,०००/- दंड करण्यात आला असून, तपासणीदरम्यान ४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

गणेशोत्सव काळात सजावट व अन्य कारणांसाठी प्लास्टिक कॅरीबॅग तसेच थर्मोकोलचा वापर होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. नागरिक, व्यापारी आणि गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढेही तपासणी करून नियमानुसार दंडात्मक कारवाई व साहित्य जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

या विशेष तपासणी मोहिमेत प्रभाग समिती क्र. १ मधील स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, किशोर कांबळे, प्रणिल माने आणि वैभव कुदळे तसेच रवी साबळे यांनी सहभाग घेतला.

महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिक व व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येते की, नियमबाह्य प्लास्टिक कॅरीबॅग व थर्मोकोलचा वापर टाळावा आणि गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

“प्लास्टिक टाळा, पर्यावरण जपा आणि गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा!”असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा