*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित भावस्पर्शी लेख*
*स्नो आता तुझ्या केवळ आठवणी*
————————————-
फोटोत दिसतोय तो आमच्या घरातील पाळीव बोका. काल त्याचे अचानक हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. गणपती उत्सवातील दणदणाटामुळे हे झाल्याचं पशु वैद्यकाने सांगितलं. त्या म्हणाल्या की गेल्या काही दिवसात अशा बऱ्याच घटना माझ्या पर्यन्त येत आहेत. काल पासून आमच्या घरातील कुणाच्याच. डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत.
तो एक पर्शियन बोका होता. अडीच वर्षापूर्वी माझ्या मुलाने हौसेने त्याला घरी आणले. सुरवातीला आम्हाला कुणालाच हे फारसं पसंत नव्हतं. पण त्या गोंडस जीवाने लवकरच आमची मने. जिंकून घेतली आणि तो आमच्या सर्वांच्याच. गळ्यातील ताईत बनला. घरातील सर्वांनीच कौतुकाने त्याच नावं “स्नो “ठेवलं होतं. पण मी मात्र त्याला बोक्या म्हणूनच हाक मारी.
क्रिमी रंगाचं, झुबकेदार शेपटी, करड्या डोळ्याचं हे जनावर अतिशय देखणं व लाघवी होतं. सुरवातीला माझ्या आवाजाला घाबरून तो मी घरात शिरताच कोचा खाली दडून बसे. पण मग हळू हळू सरावाने तो माझ्या ही जवळ येऊ लागला. मग ते इतकं वाढलं की काही विशिष्ट वेळी, विशिष्ट प्रसंगी त्याला मीच असावा लागे. सकाळी मी लवकर उठे. हा तेव्हा बऱ्याच वेळा जागा असे. मला पाहताच तो लुटू लुटू धावत जवळ येई आणि अंगाला अंग घासू लागे. मग त्याच्या अंगावरून बराच वेळ हात फिरवून त्याला जवळ घेतलं की नंतरच तो जाई. मी बाहेरून घरात आल्यावर सुध्दा तो उड्या मारत धावत येई आणि माझ्या पायावर लोळण घेई. हे बहुदा आपली लहान मुलं आपल्या मांडीवर बसतात तशी कृती असावी. त्याला लहर लागली की तो अंगाला अंग घासू लागे. मग भरपूर लाड केल्यावरच तो जाई. एक गोष्ट आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं की असे लाड केल्यावरच तो त्यांचा खाऊ खाई. ते काय तंत्र होतं ते आम्हाला कुणालाच शेवटपर्यन्त समजले नाही.
त्याची साफ सफाई करणं, त्याची घाण उचलणं पत्नी व सून न कंटाळता करत. त्याला वारंवार डॉक्टर कडे घेऊन जाण, आंघोळ घालून आणण, नख कापण त्याच्या बरोबर वेळ काढून खेळण सारं या दोघी बरोबर मुलगा नात हौसेने करत. आजूबाजूची मुलं ही त्याच्या बरोबर खेळायला हौसेन येतं. सुरवातीला त्यांना बघून बुजणारा तो नंतर चांगलाच सरावला होता. आमच्या घरी दोघी तिघी कामवालीचा ही तो चांगलाच लाडका झाला होता. त्या घरात आल्यावर आधी त्याचे लाड केल्या शिवाय सुटका नसे.
त्याच कॅट फूडच त्याला केवळ चाले. त्यामुळे इतर काही भरवून त्याचे लाड करता येतं नसतं. घरी नेहमी येणाऱ्या पाहुण्यांशीही त्यांचा चांगलाच परिचय झाला होता. ती मंडळींही त्याची फोन वरून नेहमी चौकशी करत असतं.
गेल्या काही दिवसातल्या दणदणाटामुळे तो दबावा खाली होता असं डॉक्टर सांगताहेत. त्या मुक्या जीवाला आपल्या वेदना, घुसमट सांगताही आली नाही. शेवटी त्याने काल या जगाचाच निरोप घेतला.
🙏🙏🙏🌹🌹🌹
श्रीनिवास गडकरी
बावधन पुणे
9130861304
