You are currently viewing नेहरू युवा केंद्र, आयुष, जिल्हा क्रीडा आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत योग दिन

नेहरू युवा केंद्र, आयुष, जिल्हा क्रीडा आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत योग दिन

मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी जीवनात योग महत्वाचा – के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

कोरोना सारख्या महामारीच्या कालावधीतही योग साधनेच्या जोरावर मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तमरित्या राखले जाऊ शकते याचा प्रत्यय आलेला आहे. शासकीय अधिकारी असो वा विद्यार्थी असोत जीवनामध्ये ताण तणाव मुक्त रहायचे असेल तर योगाला पर्याय नाही. मानवी जीवनात मानसिक आणि शारीरिक उत्तम आरोग्यासाठी योग महत्वाचा आहे. सर्वांनी तो करावा असा मौलिक सल्ला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिला.

                नेहरू युवा केंद्र, आयुष विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील शरद कृषी भवनात आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सरस, आयुषचे डॉ. राजेश पालव, डॉ. श्रीनिवास बांदेकर, डॉ. सुशील परब, माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, नेहरू युवा केंद्राचे विल्सन फर्नांडिस आदी उपस्थित होते.

                कार्यक्रमाच्या सुरुवातीला धन्वंतरी मूर्तीचे पूजन आणि दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. जिल्हा आयुष अधिकारी डॉ. कृपा गावडे यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी योगासने केली. यावेळी प्रत्येक योगासनाच्या प्रात्यक्षिकाबरोबर त्याचे महत्व विशद करण्यात आले.

                कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी मनिषा पाटील यांनी केले. तसेच हर्षा टेंगसे यांनी सर्वांचे अभार मानले. आजच्या योग दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा