मसाप पिंपरी – चिंचवडच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध निवड
पिंपरी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे राजन लाखे यांच्यासह पंधरा सदस्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जिल्हा प्रतिनिधी डाॅ. पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी मसाप पुणे चे कार्यवाह सुनील महाजन केंद्र निरीक्षक म्हणून उपस्थित होते. जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर ओव्हाळ, यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडप्रक्रिया संपन्न झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य अशा एकूण १५ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उपाध्यक्ष व कार्यवाह पदाच्या प्रत्येकी दोन जागांसाठी प्रत्येकी तीन अर्ज दाखल झाले होते परंतु निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत उपाध्यक्ष पदासाठी असलेले उमेदवार प्रा. डॉ. सुभाष आहेर तर कार्यवाह पदासाठी असलेले प्रा. नरहरी वाघ यांनी माघार घेतल्यानंतर अध्यक्षासह संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने जाहीर करून निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.
सदर सभेला १६४ सभासद उपस्थित होते.
नूतन पंचवार्षिक कार्यकारिणी खालीलप्रमाणे :
राजन लाखे (अध्यक्ष),
डाॅ. रजनी शेठ (उपाध्यक्ष),
मकरंद बापट (उपाध्यक्ष),
संजय जगताप (कार्यवाह),
गीता सुतार (कार्यवाह),
विजय नाईक (कोषाध्यक्ष)
कार्यकारिणी सदस्य:
किरण लाखे, दत्तू ठोकळे, डाॅ. मीनल लाड, किरण जोशी, नीलिमा फाटक, इला पवार, बाळासाहेब गोरे, अशोक होनराव आणि संजय होनकळस
सभेला संबोधित करताना सुनील महाजन यांनी, आगामी ऐतिहासिक अशा शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही नूतन कार्यकारिणी जोमाने काम करून पिंपरी – चिंचवड शाखेचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत करेल, असा विश्वास व्यक्त केला. निवडणूक प्रक्रियेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मसाप सदस्य नितीन शास्त्री, डॉ. मीनल लाड, श्रीकृष्ण पुरंदरे, संदीप राक्षे, अद्वैत ऐनापुरे यांनी पिंपरी – चिंचवड शाखेने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीविषयी गौरवोद्गार काढले. डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्व उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेचा आदर राखून केलेले सहकार्य याविषयी समाधान व्यक्त केले.
अध्यक्षपदी निवडून आलेले राजन लाखे यांनी सर्व सभासदांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
