अंध बांधवांच्या हातावर विद्यार्थिनींनी बांधली प्रेमाची राखी
NAB नेत्र रुग्णालयात कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या उपस्थितीत रक्षाबंधन उत्साहात
सावंतवाडी :
भटवाडी येथील NAB नेत्र रुग्णालयात शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रक्षाबंधनाचा भावपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी NAB मधील १०० टक्के अंध बांधवांना राखी बांधून बहीण-भावाच्या पवित्र नात्यासोबतच सामाजिक जाणिव, प्रेम आणि सहकार्याचा सुंदर संदेश दिला.
विद्यार्थिनींनी अंध बांधवांच्या हातावर राखी बांधत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. या अनोख्या उपक्रमामुळे अंध बांधवांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनींच्या या छोट्याशा भगिनीभावाचे उपस्थित अंध बांधवांनी मनापासून कौतुक केले आणि सर्व विद्यार्थिनींना प्रेमाने आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमाला NAB चे अध्यक्ष श्री. अनंत व्यंकटेश उचगावकर, रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. प्रवीण परब, सचिव श्री. सुहास सातपूर, कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने उपस्थित सर्वांना चहा व खाऊचे वाटप करण्यात आले. प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा गोड रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
