You are currently viewing नारळी पौर्णिमेचे औचित्यावर मालवणात ३० ऑगस्टला ‘पर्यटन संस्कृती’ रॅलीचे आयोजन – बाबा मोंडकर 

नारळी पौर्णिमेचे औचित्यावर मालवणात ३० ऑगस्टला ‘पर्यटन संस्कृती’ रॅलीचे आयोजन – बाबा मोंडकर 

नारळी पौर्णिमेचे औचित्यावर मालवणात ३० ऑगस्टला ‘पर्यटन संस्कृती’ रॅलीचे आयोजन – बाबा मोंडकर

मालवणवासीयांना सहभागाचे आवाहन…

मालवण

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून ३० ऑगस्ट दुपारी २ वाजता शहरातून पर्यटन संस्कृती रॅली काढण्यात येणार आहे. पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गची संस्कृती सर्वांसमोर यावी व पर्यटनात वाढ व्हावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रिक्षा संघटना, मातृत्व आधार फाउंडेशन, तारकर्ली पर्यटन विकास संस्था, सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर क्लब व पर्यटन व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रशासकीय अधिकारी व नागरीक यांच्या सहभागातून या रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील हॉटेल ऐश्वर्य येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष अवी सामंत, शहराध्यक्ष मंगेश जावकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, विदेशी मद्य विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर गाड, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष पप्या कद्रेकर, सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर क्लबचे कमलेश चव्हाण, किशोर दाभोलकर, दादा वेंगुर्लेकर, रामचंद्र चोपडेकर, राजा मांजरेकर व इतर उपस्थित होते.
श्री. मोंडकर म्हणाले, मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेष संस्कृती, इतिहास व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या बाबी महत्वाच्या असून हि संस्कृती पर्यटकांसह सर्वांसमोर आणण्याच्या दृष्टीने नारळी पौर्णिमा उत्सव निमित्ताने कल्चर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पर्यटन व त्याच्याशी संलग्न इतर व्यवसायिकांचा समन्वयही या रॅलीद्वारे घडवून आणण्यात येणार आहे.
नारळी पौर्णिमे दिवशी दुपारी २ वाजता मालवण भरड नाका येथून या रॅलीस सुरुवात होऊन बाजारपेठ मार्गे बंदर जेटी येथे हि रॅली विसर्जित होणार आहे. रॅलीचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार आहे. या रॅलीत तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, तसेच आरटीओ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बंदर जेटी किनाऱ्यावर रॅली पोहचल्यावर रिक्षा संघटनेच्या वतीने मानाचे श्रीफळ पूजा अर्चा करून सागराला अर्पण करण्यात येणार आहे.
या रॅलीत जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायती यांच्या मार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध गावच्या ग्राम पर्यटन समिती, जेटी स्टॉल धारक, पर्यटन व्यावसायिक सहभागी होणार आहेत. तसेच मच्छिमार संघटना व मालवणवासियांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन श्री. मोंडकर यांनी केले. मालवणातील जास्तीत जास्त रिक्षा व्यवसायिकांनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. कद्रेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 5 =