You are currently viewing कणकवली तालुक्यात आचारसंहिता लागू

कणकवली तालुक्यात आचारसंहिता लागू

कणकवली :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्‍या आहेत. यात कणकवली तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्‍यात पन्नास टक्‍के पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्‍याने तालुक्‍याच्या संपूर्ण ग्रामीण भागासह कणकवली नगरपंचायत क्षेत्रातही आचारसंहिता लागू असणार आहे, अशी माहिती कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.तहसीलदार पवार म्‍हणाले, निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केल्‍यानंतर संपूर्ण तालुक्‍यात आचारसंहिता लागू झाली आहे.

यामध्ये तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणुका नाहीत त्या ग्रामपंचायत आणि कणकवली नगरपंचायत हद्दीत देखील आचारसंहिता लागू राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी होईपर्यंत संपूर्ण कणकवली तालुक्यातच २० डिसेंबरपर्यंत आचारसंहितेचा अंमल लागू असणार आहे.कणकवली तालुक्यात एकूण ५३ पैकी ५८ ग्रामपंचायतींच्या एकाच वेळी निवडणुका होत आहेत. एकाच वेळी तालुक्यातील ५० टक्के पेक्षा अधिक ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असल्याने ही आचारसंहिता ही पूर्ण तालुक्याला लागू राहणार आहे.

तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यात थेट सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यांची देखील निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + sixteen =