राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त घारपी शाळेत लोकसहभागातून क्रीडा साहित्याचे वितरण
बांदा
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी केलेल्या आवाहनाला अवघ्या २४ तासांच्या आत अपेक्षित प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्वप्नांना बळ देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी व शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यानी उत्स्फूर्तपणे मदतीचा हात पुढे केला.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य उपलब्ध व्हावे, त्यांच्या अंगी असलेल्या क्रीडागुणांना योग्य संधी मिळावी आणि खेळाच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत सुर्यकांत गावडे, शामसुंदर गावडे, जान्हवी गावडे, महेश नाईक, मयूर गावडे, गोविंद (शानो) गावडे, वि. गो. देसाई गुरुजी, प्रशांत गावडे, पांडुरंग गावडे ,प्रकाश गावडे ,राजेश गावडे , सुनिल सावंत, विनय गावकर, आर्यन गावडे, सागर गावडे , हर्षद चौगुले,शरद गावडे, उमेश गावडे,लवू गावडे,आनंद गावडे ,विजय कविटकर यांनी मदत देऊन विद्यार्थ्यांच्या क्रीडा उपक्रमाला मोलाचे सहकार्य केले.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाप्रवासातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांच्या हातात खेळाचे साहित्य देऊन त्यांच्या क्रीडागुणांना व्यासपीठ मिळवून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. दानशूर व्यक्तींनी दिलेला प्रतिसाद हा केवळ आर्थिक मदत नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर व्यक्त केलेला विश्वास आहे.
या मदतीमुळे विद्यार्थ्यांना विविध खेळांचा सराव करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले असून शाळेच्या क्रीडा उपक्रमांना निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे. ‘आपली शाळा, आपली जबाबदारी’ या भावनेतून २४ तासांत मिळालेला हा प्रतिसाद समाज आणि शाळा यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारा ठरला आहे.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर उपाध्यक्ष संतोष कविटकर व सदस्य यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
