स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या घोषणेची शक्यता
मुंबई :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा ताण अखेर संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी ४ वाजता होणारी पत्रकार परिषद सर्वांच्या लक्षवेधी ठरणार आहे. निवडणुकीची औपचारिक घोषणा यावेळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व प्रलंबित निवडणुका पार पाडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आयोगाने तयारी वेगाने सुरू केली असून, निवडणुका तीन टप्प्यात घेण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायती यांची निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका पार पडतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
आयोगातील सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व निवडणुका एकाच वेळी घेणे शक्य नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने मतदान होईल. नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान, डिसेंबरमध्ये दुसरा टप्पा आणि जानेवारीच्या १० तारखेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.
निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू होणार असून, राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. आजच्या पत्रकार परिषदेकडे त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
