सांगली, प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगर पालिकेच्या वतीने नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘जनहित महापौर आढावा अभियाना’ ला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
याच मोहिमेचा भाग म्हणून आज दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रभाग समिती क्र. १ अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र. १२ व १४ मध्ये जनसंवाद व पाहणी दौरा अत्यंत उत्साहात पार पडला.
महापौर श्री. धीरज चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील या पाहणी दौऱ्यात मारुती चौक, छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, विठ्ठल मंदिर ते राजन खोत चौक, दत्त मारुती रोड, बालाजी चौक, कापड पेठ, टिळक चौक परिसर, गणपती मंदिर, गणपती पेठ, सदासुख टाकी जवळ बालाजी चौक, भाजी मंडई, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पटेल चौक उद्यान, कर्नाळ चौकी रोड, शिवशंभो चौक आणि जुना पद्माळ रोड या प्रमुख परिसरांचा समावेश होता.
दौऱ्यादरम्यान नागरिकांनी व नगरसेवकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर महापौरांनी संबंधित विभागांना खालीलप्रमाणे तत्काळ कारवाईचे आदेश दिले: मारुती मंदिरासमोरील गाळे दुरुस्तीस परवानगी देणे, मारुती चौकात डिजिटल फलक लावण्यास प्रतिबंध करणे आणि नियमबाह्य गाळ्यांना जप्ती नोटीस बजावणे. तसेच खिलारे एंटरप्राइजेसजवळील मुतारी नवीन बांधणे, बंद असलेली स्ट्रीट लाईट त्वरित चालू करणे आणि विठोबा मंदिरामोरील BSNL चा पोल व अडथळा ठरणारे झाड काढण्याचे आदेश दिले.
छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईच्या बाहेर रस्त्यावर बसणाऱ्या भाजीवाल्यांना आतमध्ये बसवण्याबाबत आणि बाहेरील रस्त्यावरील सर्व अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
विठ्ठल मंदिर ते राजन चौक परिसरातील दामले सदनिकेजवळील अनधिकृत स्टॉल हटवणे. मेन बाजारपेठेत रस्त्याच्या पट्टे मारण्याच्या आतमध्येच स्टॉलसाठी परवानगी देणे. टिळक चौक व द्वारकाधीश मंदिर समोरील झाडे छाटून अतिक्रमण काढणे.
प्रभागात खराब झालेले रस्ते व ड्रेनेज लाईन टाकणे किंवा दुरुस्ती करणे. शिवशंभो चौक ते पूल (नाला) रस्ता एकसारखा करणे आणि पुलाला साईड वॉल (ब्लॉक वॉल) करून घेणे. शिवशंभो चौक येथील मंजूर असलेली पाण्याची टाकी लवकरात लवकर उभारणे. पसायदान कॉर्नर / जुना पद्माळ रोड येथील गट नं. ४० मधील मोजणी करून रस्ता व पाण्याची टाकीबाबतची कार्यवाही मार्गी लावणे.
परिसरात नियमित औषध फवारणी करणे, कचरा कुंड्या हटवणे, नियमित कचरा उचलणे आणि शुद्ध पाणीपुरवठा व परिसर स्वच्छता राखण्याच्या सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यात महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांच्यासह उपमहापौर श्री. गजानन मगदूम, समाजकल्याण सभापती सौ. गीता सुरज पवार, आणि प्रभाग समिती क्र. १ चे सभापती श्री. रमेश रामचंद्र सर्जे उपस्थित होते.
तसेच स्थानिक नगरसेवक/नगरसेविका:
वॉर्ड क्र. १२: सौ. लक्ष्मी रघुनाथ सरगर, सौ. रइसा वसीम शिकलगार, श्री. संजय ना. यमगर.
वॉर्ड क्र. १४: सौ. मनिषा संदीप कुकडे, श्री. उदय परशुराम बेलवलकर, सौ. अनिता हणमंत पवार, श्री. युवराज सतीश बावडेकर, श्री. केदार गंगाधर खाडिलकर यांनी प्रभागातील प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले.
प्रशासकीय पातळीवर क्षेत्रीय कार्यालय क्र. १ च्या उपायुक्त श्रीम. अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त सौ. ऐश्वर्या माने, अधीक्षक श्री. माणिक गोंधळे यांच्यासह संबंधित प्रभागातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या अभियानामुळे प्रशासनात गती आणि पारदर्शकता निर्माण होत आहे.
