वैभववाडी महाविद्यालयात स्टार्टअपविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील उद्योजकता विकास कक्षामार्फत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि स्टार्टअपच्या संधींची
ओळख होण्याच्या उद्देशाने स्टार्टअपविषयक मार्गदर्शन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर स्टार्टप्सस्थानचे संस्थापक व मार्गदर्शक श्री.उमेश राऊळ, स्टाफ सेक्रेटरी प्रा.सुरेश पाटील व उद्योजकता विकास कक्षाचे समन्वयक डॉ.अजित दिघे उपस्थित होते.
या कार्यक्रमात ‘स्टार्टप्सस्थान’चे संस्थापक श्री.उमेश राऊळ यांनी विविध यशस्वी स्टार्टअप्सची उदाहरणे देत नवीन कल्पना, समस्या ओळखणे, त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कल्पनेचे व्यवसायामध्ये रूपांतर याबाबत सविस्तर माहिती दिली.
केवळ नोकरीच्या शोधात न राहता स्वतःच्या कल्पनांना संधी देऊन रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी विकसित करावा, असे आवाहन श्री. राऊळ यांनी केले. अपयशाची भीती न बाळगता सातत्याने प्रयत्न, योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्टार्टअपच्या माध्यमातून यश मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्टार्टअप क्षेत्रातील संधी, उद्योजकतेच्या विविध वाटा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांची दिशा याची सविस्तर माहिती मिळाली.
या उपक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मार्गदर्शकांशी संवाद साधत मनातील शंकांचे समाधान करून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ.अजीत दिघे यांनी मांडले.
