देवगड – तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्था ही शैक्षणिकदृष्ट्या समाजातील तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीतून शिक्षण घेता यावे यासाठी सहकार्य करणारी संस्था अशी ओळख निर्माण झाली आहे. तथापि शतकोत्तर वाटचाल केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा उद्देश असल्याचे संस्थेचे मुंबई अध्यक्ष विलास कुबल यांनी शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. प्रारंभी माजी सरपंच तथा ग्रामीण सरचिटणीस निलेश सादये यांनी मोफत शिबिर आयोजित करण्यामागील हेतू आपल्या प्रास्ताविकातून विशद केला. नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेंद्र केळकर यांनी नेत्र चिकित्सा त्यातील समज आणि गैरसमज उलगडून सांगताना मोतीबिंदू झाला म्हणजे आपणास दिसणार नाही. असा जो समज आजही करून घेण्यात येत आहे. दूर केला तर मनात संभ्रमावस्था निर्माण होणार नाही. खरं तर नेत्र तपासणी सरकारी दवाखान्यात चांगल्या प्रकारे होते. त्यांचा आपण लाभ घेणे गरजेचे आहे. असे यावेळी नमूद केले. या प्रसंगी डॉ रामदास बोरकर, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ब्लड प्रेशर, मधुमेह आणि नेत्र चिकित्सा यांचा समावेश असल्याने लोकांनी लाभ घेतला. याप्रसगी धावपटू राजेंद्र सादये, शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव फाले, उपशिक्षक रामनाथ गोसावी, आरमारी मराठा चॅनेलचे सुधीर कोमुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत शांताराम कोळंबकर, अंतर्गत हिशोब तपासणीस दत्तात्रय विठोबा धावडे, खजिनदार राजाराम मोतीराम बांदकर आदींनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी सूत्रसंचालन निलेश सादये यांनी केले.
तांबळडेग येथे आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार
- Post published:फेब्रुवारी 26, 2024
- Post category:देवगड / बातम्या / विशेष / सामाजिक / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments