You are currently viewing मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खासदार विशाल पाटील यांची बैठक

मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खासदार विशाल पाटील यांची बैठक

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

मुंबई येथे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगली मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत खासदार विशाल पाटील यानी सविस्तर चर्चा केली. यावेळी सांगली जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आवश्यक मागण्या मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडल्या.

खासदारांच्या विविध मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदारांनाही निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. राज्यस्तरीय दिशा समितीची बैठक लवकरच आयोजित केली जाणार आहे. शिवाय मुंबईतील खासदारांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोरा निवास येथे निवासाची व्यवस्था करण्याबाबतही मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली आहे. यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खा. सुप्रियाताई सुळे यांचेसह महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील खासदार व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी मांडलेल्या मागण्या अशा : सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात सायं. ६ ते रात्री १० या वेळेत विद्युत पुरवठा बंद असतो. लोडशेडिंगच्या वेळेत बदल करून या कालावधीत तातडीने विद्युत पुरवठा सुरू करावा. सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे राज्य शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने रखडली आहेत. केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनानेही आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन ही कामे तातडीने मार्गी लावावीत. सांगली जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीकविमा निकषात बदल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देण्यात यावी. कृष्णा कालवा मध्यम प्रकल्पाची आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. वसंतदादा स्मारकाच्या उर्वरित बांधकाम व दुरुस्तीसाठी ८ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा