वेंगुर्ल्यात गणेशोत्सवासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन
१२ व १३ सप्टेंबरला मुख्य बाजारपेठेत वाहनांना प्रवेशबंदी; अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
वेंगुर्ले :
वेंगुर्ले नगर परिषदेच्या सभागृहात गणेशोत्सव नियोजन बैठक नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील गर्दी, वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या टाळण्यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग तसेच मुख्य बाजारपेठेत वाहनांना प्रवेशबंदी आदी निर्णय घेण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त १२ व १३ सप्टेंबर रोजी मुख्य बाजारपेठेत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या दोन दिवसांत बॅ. खर्डेकर रोडवरील मारुती मंदिर ते दाभोली नाका या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ व्यापाऱ्यांना माटवीचे साहित्य विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
चारचाकी, दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग
चारचाकी वाहनांसाठी गणेश कॉम्प्लेक्स, शाळा क्रमांक १, सिद्धिविनायक प्लाझा, कन्याशाळा, नगरवाचनालय, पाटील सेंटर, लता अपार्टमेंट तसेच महालक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोरील मोकळ्या जागेचा वापर करण्यात येणार आहे. दुचाकी वाहनांसाठी वेंगुर्लेकरवाडी व रामेश्वर मंदिर परिसर निश्चित करण्यात आला आहे. मालवाहू तीनचाकी वाहनांसाठी सप्तसागर ते मारुती मंदिर परिसराचा वापर करण्याचे नियोजन आहे.
मोठ्या वाहनांसाठी सागररत्न मत्स्यबाजारासमोरील मोकळी जागा, सप्तसागर, रामेश्वर मंदिर तसेच मराठी शाळा क्रमांक १ चे पटांगण आदी ठिकाणांचा वापर करण्यात येणार आहे.
१० ते २६ सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना पर्यायी मार्ग
गणेशोत्सव कालावधीत १० ते २६ सप्टेंबरदरम्यान शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. हॉस्पिटल नाका ते दाभोली नाका या मुख्य मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करून त्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. एस.टी. बसचा थांबा दरवर्षीप्रमाणे रामेश्वर मंदिराजवळ ठेवण्यात येणार असून, रामेश्वर मंदिर व हॉस्पिटल नाका येथे एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे.
रिक्षांसाठी वन-वे; ट्रॅव्हल्सना शहरात थांबण्यास बंदी
रिक्षांसाठी मुख्य बाजारपेठेत एकेरी मार्गाची व्यवस्था करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनानंतर पाच दिवसांनी याच मार्गावर चारचाकी वाहनांसाठीही एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव कालावधीत शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सना शहरातील रस्त्यांवर थांबण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. ट्रॅव्हल्ससाठी मानसीश्वर उद्यानासमोरील मोकळी जागा आणि कॅम्प येथील स्टेडियमशेजारील मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे.
मालवाहतुकीसाठी वेळ निश्चित
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही वेळ निश्चित करण्यात आली आहे. १० ते २६ सप्टेंबरदरम्यान रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेतच मालवाहू वाहनांना शहरात माल वाहतूक करता येणार आहे. इतर दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मालवाहतुकीस परवानगी देण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर
नगर परिषदेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात आला आहे. गणेशमूर्ती मातीच्या अथवा शाडू मातीच्या असाव्यात तसेच मूर्तीभोवतीची सजावट प्लास्टिक व थर्माकोलमुक्त असावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर आढळल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांनी गणेशोत्सव काळात निर्माल्य रस्त्यावर किंवा जलस्रोतांमध्ये न टाकता नगर परिषदेच्या निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.
