महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव; वेंगुर्ल्यात तीन दिवसीय प्रदर्शन महोत्सव!
*३० ऑक्टोबरपासून साई मंगल कार्यालयात आयोजन; १० महिला उद्योजिकांचा सन्मान, लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा*
*सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन; संध्या तेरसे प्रमुख अतिथी*
महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे, या उद्देशाने इनरव्हील क्लब वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात होणाऱ्या या महोत्सवात १० महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात येणार असून, लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळाही याचवेळी होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते होणार असून, नर्मदा आई संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना मिळणार व्यासपीठ
महिला बचत गट, गृहउद्योजिका आणि नवउद्योजिकांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, गृहोपयोगी साहित्य, विविध उत्पादने आणि खाद्यपदार्थ या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध असतील. महिलांनी स्वतःच्या कौशल्यातून आणि मेहनतीतून तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, ग्राहकांशी थेट संपर्क साधता यावा आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार व्हावा, हा या महोत्सवामागील प्रमुख हेतू आहे. विविध क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या १० महिला उद्योजिकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरवही करण्यात येणार आहे.
महिला सक्षमीकरणासाठी फाऊंडेशनचा पुढाकार
या महोत्सवाच्या निमित्ताने लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशन, वेंगुर्ला यांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे आणि त्यांना उद्योग-व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे, या उद्देशाने फाऊंडेशनच्या माध्यमातून भविष्यात विविध महिला-केंद्रित उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. महिलांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देतानाच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संस्थेचा मानस आहे. पदग्रहण सोहळ्याद्वारे संस्थेच्या आगामी कार्याची दिशा अधिक स्पष्ट होणार आहे.
*रील्स स्पर्धेत १२ हजारांची पारितोषिके*
महिला उद्योजिकांची उत्पादने आणि त्यांचे कार्य समाजमाध्यमांवर पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार, तृतीय क्रमांकासाठी २ हजार, तर उत्तेजनार्थ प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी १ हजार रुपये अशी एकूण १२ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी प्रदर्शनातील उत्पादने, महिला उद्योजिकांचे कार्य, खरेदीचा अनुभव किंवा ग्राहकांच्या प्रतिक्रियांवर आधारित ३० सेकंद ते एक मिनिटाची स्वतः चित्रीत केलेली मराठी रील तयार करावी. रीलचा आशय सत्य आणि सकारात्मक असावा. Instagram वर रील पोस्ट करताना #लक्ष्मीआधार2026 हा हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे.
महोत्सवाची वेळ सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत राहणार आहे. स्टॉल नोंदणीसाठी ज्योती देसाई (९४२०२५८७७७) , सौ.वृंदा गवंडळकर ( ९८२३११८७७८ )यांच्याशी संपर्क साधावा. वेंगुर्ला आणि परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन महिला उद्योजिकांच्या उत्पादनांची
खरेदी करावी आणि त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या प्रदर्शन व विक्री मोहस्तवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इनरव्हील क्लब अध्यक्ष सौ ज्योती देसाई उपाध्यक्ष सई चव्हाण,सेक्रेटरी श्रीया परब, ट्रेझरर सौ वृंदा गवंडळकर, सदस्य ॲड .अनुराधा वेर्णेकर, लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या खजिनदार डॉ.दिपाली देसाई, सदस्य सौ शुभदा नवार, दिपाली अभ्यंकर, काजल गिरप उपस्थित होत्या.
