You are currently viewing आपल्या दुःखांचा उत्सव

आपल्या दुःखांचा उत्सव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आपल्या दुःखांचा उत्सव*

 

आपणं आपल्या दुःखांचा

उत्सव साजरा करायचा

आणि सुखा पेक्षा

दुःखाचाच हात धरायचा

 

कारणं सुखात सर्वेच साथीदार असतात

दुःखात कोणीच भागीदारी नसतो

मी आहे ना म्हणणाऱ्यांचा हात

कळत नाही कधी हातून सुटतो

 

म्हणून जे सोडून जातात

त्यांच्या आठवणीची आरती करायची

जखमांना फुले समजून

छातीशी घट्ट धरून ठेवायची

 

कितीही रडावसं वाटलं तरी

डोळ्यांना हसायची सवय लावायची

रात्रीच्या कवेत शिरून

नव्या स्वप्नांची पहाट बघायची

 

लोकं विचारतील

इतकं दुःख घेऊन कसा जगतोस

सांगायचं त्यांना

ज्याला दुःखाची सवय असते

त्याला सुखाच्या सावलीची गरज नसते

 

जवळ कोणी नसलं तरी चालेल

एकांतात बसून

जुन्या आठवणींची पणती पेटवायची

हरवलेली माणसं पुन्हा पुन्हा आठवायची

 

आणि आपल्या डोळ्यातून गाळणाऱ्या प्रत्येक अश्रूला

हात जोडून सांगायचं

तूच तर आहेस माझ्या सोबतीला

बाकी सगळे निघून गेलेत

दुःखाच्या पावलांवर

तुझेच फुले वाहीलेत

 

कारण आपण सर्वांना

आपलेच म्हणतो पण

कोणी कुणाचं नसतं राव

सुखाच्या वस्तीमधे

कधीच नसतं दुःखाच गाव

 

म्हणून म्हणतोय

आपणं आपल्या दुःखाचा

उत्सव साजरा करायचा

आनंदाच्या गर्दीत

दुःखाचा हात धरायचा

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा