You are currently viewing मळगाव घाटीत बेपत्ता महेश पेडणेकरांचा मृतदेह सापडला

मळगाव घाटीत बेपत्ता महेश पेडणेकरांचा मृतदेह सापडला

मळगाव घाटीत बेपत्ता महेश पेडणेकरांचा मृतदेह सापडला

दोन दिवसांच्या शोधमोहीमेला दुर्दैवी पूर्णविराम; मृत्यूचे गूढ कायम

सावंतवाडी :

मित्रासोबत मासेमारीसाठी घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता असलेले माजगाव-कुंभारवाडी येथील महेश लक्ष्मण पेडणेकर (४८) यांचा मृतदेह मळगाव घाटीतील दुसऱ्या धबधब्याच्या खालच्या बाजूस पाण्याच्या प्रवाहात आढळून आला. मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून, त्यांच्या मृत्यूबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महेश पेडणेकर हे सोमवारी (१० ऑगस्ट) दुपारी सुमारे १२ वाजता चराठा येथील मित्र यशवंत उर्फ योगेश विष्णू परब यांच्यासोबत तेरेखोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर त्यांच्या पत्नी मिनल महेश पेडणेकर (४०) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात नापत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी नापत्ता रजिस्टर क्रमांक ४०/२०२६ अन्वये नोंद करून शोधमोहीम सुरू केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार पाटील करीत होते.
दरम्यान, मळगाव घाटीतील दुसऱ्या धबधब्याच्या खालच्या बाजूला पाण्याच्या प्रवाहात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना स्थानिकांच्या निदर्शनास आला. माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, माजी सभापती राजू परब यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. मृतदेह महेश पेडणेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.
सावंतवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
महेश पेडणेकर हे समुद्रात मासेमारीसाठी गेले असताना नेमके मळगाव घाटीत कसे पोहोचले? त्यांचा मृत्यू बुडून झाला की यामागे अन्य काही कारण आहे? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील मृत्यूचे गूढ कायम असून पोलीस सर्व शक्यता तपासून अधिक तपास करीत आहेत.
या घटनेमुळे माजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून पेडणेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा