You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील महिला अतिदक्षता कक्षाचा सेंट्रल एसी सुरू

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील महिला अतिदक्षता कक्षाचा सेंट्रल एसी सुरू

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील महिला अतिदक्षता कक्षाचा सेंट्रल एसी सुरू

राजू मसुरकर यांच्या पाठपुराव्याला यश; पंधरा दिवसांनंतर महिला रुग्णांना दिलासा

सावंतवाडी :

येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला अतिदक्षता कक्षाचा सेंट्रल एसी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने उष्णतेमुळे महिला रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी सकाळी पुण्याहून तंत्रज्ञ पाठविण्यात आले. त्यानंतर बंद पडलेला सेंट्रल एसी पूर्ववत सुरू करण्यात आला असून महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिला अतिदक्षता कक्षातील एसी बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन राजू मसुरकर यांनी संबंधित कंपनीचे मेंटेनन्स मॅनेजर सुमित काकडे यांच्याशी संपर्क साधून दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे पुण्याहून एसी दुरुस्तीचे तंत्रज्ञ पाठविण्यात आले आणि अखेर एसी सुरू झाला.
यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक तथा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विशाल पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांना लेखी पत्र पाठवून पाठपुरावा केला होता. तसेच जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे आणि अनिलकुमार देसाई यांच्याशीही यासंदर्भात संपर्क साधण्यात आला होता.
एसी बंद असल्याने रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळावा, यासाठी राजू मसुरकर यांच्या पुढाकारातून दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने रुग्णालयाला दहा स्टँड फॅन उपलब्ध करून देण्यात आले होते. यामध्ये निवृत्त स्टेट बँक अधिकारी प्रफुल्ल सांगोडकर, हॉटेल व्यावसायिक राजू भालेकर आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी पोकळे यांनी सहकार्य केले.
दरम्यान, संबंधित कंपनीची सुमारे १० लाख ५० हजार रुपयांची देय रक्कम प्रलंबित असल्याने कंपनीकडून देखभाल-दुरुस्तीच्या कामात अडचणी येत होत्या. ही रक्कम कंपनीला लवकर मिळावी, यासाठीही राजू मसुरकर प्रयत्नशील आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली असून, संबंधित कंपनीला लवकरच देय रक्कम मिळण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती राजू मसुरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा