वैद्यकीय संशोधनाला चालना; 61 डॉक्टर, विद्यार्थी व संशोधकांचा सहभाग
सिंधुदुर्ग : वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना देणे, डॉक्टर व विद्यार्थ्यांमध्ये संशोधनविषयक दृष्टिकोन विकसित करणे आणि संशोधन संकल्पनेपासून शोधनिबंधाच्या प्रकाशनापर्यंतच्या प्रक्रियेची माहिती देण्याच्या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे जिल्ह्यातील पहिली ‘मेडिकल रिसर्च वर्कशॉप’ एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग (MEU) यांच्या संयुक्त विद्यमाने अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला एकूण 61 सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेत पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाचे उपअधिष्ठाता डॉ. श्रेयस बुरूटे यांच्यासह डॉ. प्रिया प्रभू (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज), डॉ. प्राजक्ता थेटे, डॉ. लतेश रघुते, डॉ. महेश सूर्यवंशी, डॉ. स्मिता पाटील, डॉ. अंतरा पोहरेगावकर आणि डॉ. जितेश राणे यांनी विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन केले.
यावेळी संशोधनासाठी योग्य प्रश्नाची निवड, संशोधन आराखड्याचे प्रकार, नमुना निवड पद्धती, नमुना आकार निश्चित करणे, माहितीचे प्रकार व सादरीकरण, प्रश्नावली तयार करणे, जैववैद्यकीय संशोधनातील नैतिकता, संशोधन साहित्याचा शोध तसेच संशोधन लेखांचे चिकित्सक मूल्यमापन या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेमुळे सहभागी डॉक्टर, पदवीपूर्व विद्यार्थी, इंटर्न्स आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधनाची शास्त्रीय पद्धत समजून घेण्याची तसेच दर्जेदार संशोधन लेखन व प्रकाशनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळाली. सैद्धांतिक मार्गदर्शनासोबत संशोधनातील व्यावहारिक बाबींवरही विशेष भर देण्यात आला.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागींचा अभिप्राय घेण्यात आला आणि सर्व सहभागीना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. वैद्यकीय संशोधनाची गुणवत्ता वाढविणे, संशोधन संस्कृती विकसित करणे आणि पुराव्यांवर आधारित आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे, उपअधिष्ठाता डॉ. श्रेयस बुरूटे, औषधशास्त्र विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग (MEU) तसेच आयोजन समितीचे विशेष सहकार्य लाभले.
