सावंतवाडीत १४ ऑगस्टला अपघात विमा व आधार अद्ययावत शिबिर
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचा पुढाकार; नागरिकांना अल्पदरात विमा व आधार दुरुस्तीची सुविधा
सावंतवाडी : प्रतिनिधी :
नागरिकांना अपघात विम्याचे संरक्षण मिळावे तसेच आधारकार्डमधील त्रुटी दूर करून ते अद्ययावत करता यावे, यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या पुढाकाराने सावंतवाडी शहरातील उभा बाजार परिसरात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या अपघात विमा योजनांची माहिती व विमा काढण्याची सुविधा पोस्ट खात्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १८ ते ६५ वर्षे वयोगटातील नागरिकांना अल्प वार्षिक प्रीमियममध्ये अपघाती विमा संरक्षण घेता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
उपलब्ध योजनेनुसार ₹७५५ वार्षिक प्रीमियममध्ये ₹१५ लाखांपर्यंत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाचे विमा संरक्षण मिळू शकते. याशिवाय योजनेच्या अटी व नियमानुसार वैद्यकीय प्रतिपूर्ती, रुग्णालयातील दैनिक रोख लाभ, तुटलेली हाडे, भाजणे, बालशिक्षण तसेच अंत्यसंस्कार खर्च यांसारखे विविध लाभ उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच आधारकार्डमध्ये मोबाईल क्रमांक बदलणे, नावातील चुका दुरुस्त करणे व आवश्यक अद्ययावत प्रक्रिया यासाठीही नागरिकांना मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अपघातामुळे कुटुंबावर अचानक आर्थिक संकट ओढवू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अपघात विम्याचा विचार करावा, असे आवाहन राजू मसुरकर यांनी केले आहे. या शिबिराची माहिती मित्रमंडळी, नातेवाईक व ग्रामस्थांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
शिबिराचे ठिकाण : जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान कार्यालय, उभा बाजार, सुवर्णा पेठ, सावंतवाडी — जगन्नाथराव भोसले गार्डनच्या पाठीमागील पोस्ट ऑफिस परिसर.
वेळ : सकाळी १० ते दुपारी २
दिनांक : शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६
टीप : विमा योजनेतील लाभ, प्रतीक्षा कालावधी, पात्रता व अपवाद हे संबंधित विमा कंपनीच्या अधिकृत अटी व शर्तींनुसार लागू राहतील.
