प्रस्तावित एम-सॅण्ड प्रकल्पाला विरोध; केर गावाच्या पाठीशी ठाम उभे राहणार – उपसभापती गणेशप्रसाद गवस
‘सभापती आपल्या दारी’ कार्यक्रमात ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट; लघु पाटबंधारे जलसंधारण प्रकल्पालाच प्राधान्य देण्याची मागणी
केर : दोडामार्ग
प्रस्तावित एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) प्रकल्पाला केर ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून, गावाच्या जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी ग्रामस्थांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे.
‘सभापती आपल्या दारी’ या कार्यक्रमादरम्यान केर-भेकुर्ली ग्रामस्थांनी प्रस्तावित एम-सॅण्ड प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी उपसभापती गणेशप्रसाद गवस म्हणाले, “केर गावाच्या भावना आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. प्रस्तावित एम-सॅण्ड प्रकल्पाला आमचा ठाम विरोध राहील. त्या ठिकाणी लघु पाटबंधारे विभागाचा जलसंधारण प्रकल्प प्रस्तावित असल्याची आम्हाला पूर्ण जाणीव असून, परिसराच्या हितासाठी तोच प्रकल्प अधिक महत्त्वाचा आहे.”
या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनीही ग्रामस्थांच्या भावना जाणून घेत परिसराच्या विकासाबरोबरच पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देण्याची भूमिका व्यक्त केली.
केर गावाच्या जलस्रोत, जंगल आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने एकत्र येत एम-सॅण्ड प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, प्रस्तावित लघु पाटबंधारे जलसंधारण प्रकल्पाची अंमलबजावणी करून परिसराच्या शाश्वत विकासाला चालना द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
“जंगल वाचवा, नदी वाचवा, केर गाव वाचवा” असा संदेश देत ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणासाठी एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले.
