*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*विठू माझा लेकूरवाळा*
मृगनक्षत्र बरसल्यावर बळीराजा पेरण्या करतो. आषाढाची संततधार लागते. इवल्याशा पानांच्या पाकोळ्या बीजांकरणानंतर शेतात खेळू लागतात. ही हिरवाई बघता बघता बळीराजा, त्यावर चालणारे व्यवसायी, चाकरमाने, बाया बापड्या वारीची तयारी करू लागतात.
थोडी पैशाची, कापडं, खायचं सामान बस्स!इतकंसच पुरतं.
निघायचा दिवस ठरतो व मन पांखरावाणी पंढरपूरी घिरट्या घालू लागतं.
भर पावसात वाट तुडवत हे श्रद्धाळू दरवर्षी निघतात. म्हणुन हे वारकरी. पांढरी वस्त्रे, गळ्यात माळ, भाळी गंध, आणि बायांच्या डोईवर तुळशीवृंदावन.
पाऊले वेगात दिवेघाट चालतात ऊतरतात. मिळेल ते खायच मिळेल तिथे झोपायचं सकाळी आवरून परत निघायचं.
पहिलं इंद्रायणी काठी आळंदी संत ज्ञानोबांसाठी व देहू संत तुकोबांसाठी गाठायचे. तिथल्या पवित्र स्नानानंतर दिंड्या पालख्यांसह चंद्रभागेतीरी निघायचं.
हे असं माहेरी निघालेल्या लेकींसारखं यांचं मनपाखरू विठूरायासाठी धावत असतं. मनात त्या मायबापाची गळाभेट घ्यायची ओढ असते.
कधी पोचतो?चरणस्पर्ष करतो? विठूराय डोळेभरून बघतो. मनात साठवून घेतो असे घायकूतीला येतात. तगमग वाढत रहाते.
जात पात, धर्म, ऊच्चनीचता, सा-यांना भेदून फक्त वारकरी हीच जात, भक्ती हाच जिव्हाळा, आणि सर्व त्या विठूरायाची लेकरे.
ही एकच भावना त्यांच्यात असते.
भोळा भक्तीभाव, साधे आचरण, आपुलकी, शून्य भेदभाव ही अशी गुणसंपन्न लेकरं व त्यांची भक्ती पाहुन तो वीटेवरचा पांडूरंग भाराऊन जातो.
त्यालाही लेकरांना कधी भेटेन असंच होत असेल.
पहिल्यांदा ज्ञानोबा, सोपान निवृत्ती व मुक्ताई पंढरीला गेले आणि त्याच्या भक्तीत गुंतले. पुंडलीकासाठी वाट पहात हा जगजेठी वीटेवर ऊभा आहे.
मग जनाई त्याच्या भक्तीत विरघळली. मार खाई ,ऊपास सोसे पण विठूरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन जाई.
पुढे चोखोबा, गोरोबा, विसाजी, नरहरी सोनार, तुकोबा नामदेव एकनाथ, कान्होपात्रा, सारे भक्त त्याच्या भक्तीत रमले संसार व्यवसाय विसरले.
देवाने त्यांना आपली लेकरे मानली आणि त्यांचा मायबाप झाला. पंढरी त्यांचे माहेर झाले.
रखमाई रागावली, रूसली तरी देवाने लेकरांना अंगा खांद्यावरच खेळू दिले.
त्यांचा सेवक होऊन जनाईचे दळणकांडण, सावताचा मळा, विसोबाची खेचरे, चोखोबाची गुरे गोरोबाची मडकी, एकनाथाघरी पाणक्या अशी आपल्या लेकरांची सेवा बिनबोभाट करत राहिला.
यातुन समाज घडवला गेला… भक्तीमार्ग तयार झाला, जातीयता, अस्पृष्यता, ऊच्चनीचता, भूतदया बंधूभाव समानता समाजास अभंग ,किर्तन, भारूड ,प्रवचन यातून दिली गेली. हिंसा संपुन भोळा वैष्णव धर्म स्थापला गेला. भागवत धर्म झाला, मराठी भाषा, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत संतसाहित्य शोधले गेले . समाज प्रबोधन झाले. समाजाची घडीच बहवली गेली. मनी संवेदना जागृत झाल्या.
असा संत ज्ञानोबांनी ‘ज्ञानेश्वरी ‘लिहून जिवनाचे सारच त्यात दाखवले. जगाच्या कल्याणा ‘पसायदान ‘मागितले. भक्तीभावाचा पायाच घातला.
प्रत्येकाने एकेक वीट रचत शेवटी संत तुकोबांनी कळस चढवला.
अशी आपली लेकरं विठूरायाला चिकटली. अंगा खांद्यावर खेळली. भोळ्या भक्तीची ओढ देवालाही लावली आणि विठूराय लेकूरवाळा झाला तो झालाच.
सावळे सुंदर रूप मनोहर कर्नाटकातून पंढरपूरी पुंडलीकासाठी आले आणि इथेच युगे युगे या लेकरांसाठी वीटेवरी ऊभे राहिले. सगळं जाती धर्माचे वीष पिऊन रंग बदलून घेतला. भोळ्या भक्तांसाठी साधेच रूप राखले.
आणि तो कानडा राजा झाला.
गळ्यात वक्षावरी रूळणारी तुळशी माळा, कटीला पितांबर, भाळी कस्तुरी टिळा, कानी कुंडल, हाती पायी वाळे . इतकं साधे रूप. हातात शस्त्रच नाही. भोळ्या लेकरांना भेटायचं मग बाप कधी शस्त्र धरेल काय?
विठू रायाच्या मायेला भक्तीची किनार,
सर्व सुखाचे आगर वाटे पंढरी माहेर.
आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी,
भक्तीभाव भोळा तोच खरा वारकरी.
अनुराधा जोशी.
9820023605
