You are currently viewing माझी खाद्य संस्कृती

माझी खाद्य संस्कृती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी खाद्य संस्कृती*

(भाग०६)

*कलकत्ता*

 

*कलकत्ता* म्हणजे *हाशिमरा* ला जातांना किंवा *आग्नेय भारतात* जातांना गाडी बदलण्याचं ठिकाण,या पलीकडे तिथे गेलो नाही.तरीही *कलईकोंडा आणि खरगपूर* तेथून जवळ.

*(तेंव्हा ते कलकत्ताचं होतं, कोलकाता झालं नव्हतं.)*

 

*कलकत्ता* म्हणजे *गीतांजली एक्सप्रेस* ने जाणं ओघानेच आलं,तेंव्हा ती नव्यानेच सुरु झाली होती. अगदी स्वच्छ, जलद आणि आरामदायी.फक्त ती इगतपुरीहून होती ,नासिकला थांबत नसायची;त्यामुळे येताजाता *इगतपुरी.*

 

कलकत्त्याला *एक्सप्लनेड स्क्वेअर* ए मस्ट सी प्लेस,इथंच ते आग्नेय भारतात जाणाऱ्या प्रायव्हेट बस गाड्याचे स्थानक आहे.

ह्याच एरियात *दास मिठाई* पण आहे.

ते एक जायलाच पाहिजे असं डेस्टिनेशन.

तिथला *रसोगुल्ला* हा एवढा मोठ्ठा.चेंडू एवढा.

 

(रसगुलल्याची खाण्याची पण एक पद्धत आहे ती इथं बंगाल मध्येच शिकलो, रसोगुलला पाकात भिजवलेला असला तरी खातांना तो तीन बोटात पकडून पाक निचरून टाकायचा आणि मग तो तोंडात टाकायचा.

रसोगुलला आणि गुलाबजाम मध्ये हाच फरक महत्वाचा,समजा तुम्ही गुलाबजाम सारखा तो खाल्ला, लगेच ओळखतील ते, यु आर नॉन बेंगॉली)

 

*दास मिठाई* मध्ये टिपिकल ड्रेस मधले वेटर आणि टेबलक्लाथ आहेत.भिंतीवर आणि टेबलावर जगातल्या प्रत्येक भाषेत लिहिलेलं *”दास मिठाई”*,चांगलंच लक्षात राहिलंय.

 

जवळच *व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल* किंवा *म्युझीयम* ,आहे बघण्यासारखं आहे ते .अनेक प्रचंड आकाराचे माशांचे स्केलेटन छताला टांगलेले आणि

एका हॉलच्या छतावर एक पेंटिंग काढलेले आहे, एक राजाची मिरवणूक चालली आहे, त्यातील सर्व जण अगदी प्राणी, म्हणजे घोडे, हत्ती इ.हॉलच्या कोणत्याही ठिकाणाहून पहा तुमच्याकडेच पहात आहे असे वाटते.

(असेच पेंटिंग दिल्लीत राष्ट्रपती भवनात जिथे शपथग्रहन सोहळा होतो त्या ठिकाणी छतावर आहे)

 

ही इमारत *किंग जॉर्ज* च्या सन्मानार्थ *प्रती ताजमहल* म्हणून बांधण्यात आली होती, परंतु यत्किंचितही ताजमहल न होता झाली होती ती ही वास्तू.ही माहिती मला स्थानिकांकडून मिळाली खऱ्या खोट्याची शहानिशा न करता इथं दिली आहे.खोटी किंवा अन्य काही माहिती असल्यास क्षमस्व !

पण ही माहिती मला आवडली आणि भावली यास्तव येथे सांगितली.

 

पण लक्षात राहिला तो त्या मेमोरियल हॉल च्या गेटसमोरचा *पाणीपुरीवाला.*

लक्षात राहिला म्हणण्यापेक्षा, *डोक्यात गेला* होता तो.

तो थांबतच नव्हता.एकामागून एक पुरी भरून देत राहिला थांब म्हटल्यावर पाच प्लेटचे पैसे घेतले.

आपल्या इथं एक प्लेट झाली की विचारलं जातं “और?”

इथं तो प्रकार नाही.

लई लब्बाड राव !

 

*कलकत्ता* म्हणजे राहायचं *महाराष्ट्र भुवनात,* जेवायचंही तिथेच.

का? म्हणून का विचारताय?

अहो, परवडतं ना ते !

दररोज पडवळ का असेना जेवणात, आपल्याला काय त्याचे ?

बाहेर हादडून होतंच ना आपलं !

राहायची सोय उत्तम होते ना मग झालं !

 

*हावडा ब्रिज* पाहिला?

सिनेमा नाही, प्रत्यक्ष *हावडा ब्रिज* हो !

हावडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर लगेच आहे तो हावडा ब्रिज,तोच तो घडी होणारा.

आजकाल त्याची घडी होत नाही कारण तशी वेळच येत नाही.ह्याचेवर प्रचंड गर्दी असते अगदी दिवसरात्र.

ह्या टोकाला हावडा रेल्वे स्टेशन आणि त्या टोकाला खाली उतरून गेल की प्रचंड मोठा फुलबाजार.

पुलावरुनच तो पाहायचा.

अबब केवढी फुले आणि किती प्रकारची विचारुच नका !

खूप मनोहारी दृश्य ते, आजही डोळ्यासमोर येते.

आयुष्यात प्रथमच *कच्चे सिंघाडे* येथेच खाल्ले होते हातगाडीवर.

 

एम जी रोड म्हणजे प्रमुख बाजारपेठ,सगळे ब्रॅण्डेड शॉप इथेच,दाटीवाटीने.

*(प्रत्येक शहरांत एम जी रोड असतोच असतो)*

आणि ह्याच रोडखाली समांतर धावणारी मेट्रो.

सर्व प्रथम मेट्रो पाहीली आणि अनुभवली इथेच.

भारतात इथंच मेट्रो प्रथम आली.

हे अजब शहर आहे इथं *ट्राम* आहे, *मानवी रिक्षा* आहे,*सायकल रिक्षा* आहे, *लोकल* आहे आणि *मेट्रो* ही आहे.तिकीट दरवाढ होऊ द्यायची नाही हे सरकारी धोरण असल्याने सर्व सेवा बकाल.

छोट्या छोट्या शहरातल्या बसेस तर विचारुच नका.

खिडकीच्या काचा फुटलेल्या पावसाळ्यात पाणी आत येऊ नये म्हणून लाकडी खोक्यांच्या फळ्या लावलेल्या

 

*डलहौसी स्क्वेअर* किंवा *BBD स्क्वेअर*

सर्वात वर्दळीचं ठिकाण.

अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या/एजंट इथंच

 

BBD हे नामकरण तीन स्वातंत्र्य योध्यानवरून पडले

बिनॉय बासू

बादल गुप्ता

दिनेश चंद्र गुप्ता, हे ते तिघे

त्या अगोदर त्याला *टॅंक स्क्वेअर* म्हणायचे म्हणे !

 

इंग्रजांनी जेथे दीर्घ काळ राज्य केले ते म्हणजे बेंगॉल,यथेच्छ लुटले आणि दारिद्र्यात ढकललेला हा प्रांत.

कर देण्यास नाही म्हणणार, सुधारणा करण्यास नाही म्हणणार असा हा नकारघंटा सतत वाजवणारा प्रांत म्हणून राहणीमानात खूप मोठी दरी.

 

अर्थात हे निरीक्षण खूप वर्षांपूर्वी केलेले आहे, सद्य परिस्थिती भिन्न असू शकते.

 

—राजा जोशी

〰️〰️〰️〰️〰️〰️

प्रतिक्रिया व्यक्त करा