You are currently viewing दोडामार्गात ‘श्री पद्धती’ने भात लागवडीचा अभिनव प्रयोग; लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे शेतात श्रमदान

दोडामार्गात ‘श्री पद्धती’ने भात लागवडीचा अभिनव प्रयोग; लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे शेतात श्रमदान

दोडामार्गात ‘श्री पद्धती’ने भात लागवडीचा अभिनव प्रयोग; लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे शेतात श्रमदान

मणेरी येथे आधुनिक, कमी खर्चिक व शाश्वत शेतीचा संदेश; ‘एसआरआय’ पद्धतीचा अवलंब करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

दोडामार्ग :

दोडामार्ग पंचायत समितीच्या वतीने मणेरी येथील शेतकरी देसाई यांच्या शेतात ‘श्री पद्धती’ (SRI – System of Rice Intensification) द्वारे भात लागवडीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम, कमी खर्चिक आणि शाश्वत शेतीकडे वळविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष चिखलात उतरून भात लागवड करत श्रमदान केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
‘श्री पद्धती’मुळे कमी बियाणे, कमी पाण्याचा वापर, रोपांची योग्य वाढ आणि अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर ही पद्धत शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायी ठरत असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य साक्षी तळवडेकर, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर, स्नेहा गवस, सोनिया कुबल-नाईक व सायली निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
उपस्थित सर्वांनी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष श्रमदान करत आधुनिक व शाश्वत शेतीचा संदेश गावागावात पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे दोडामार्ग तालुक्यात ‘श्री पद्धती’चा प्रसार होऊन अधिकाधिक शेतकरी या आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा